ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू तसेच आठवा मानांकित समीर वर्मा यांनी सय्यद मोदी चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली.

बाबू बनारसी दास आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने उत्कंठापूर्ण लढतीत इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानीआवर २१-११, २१-१९ अशी मात केली. तिला विजेतेपदासाठी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्काच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. ग्रेगोरियाने उपांत्य फेरीत आपलीच सहकारी हॅना रामदिनीचे आव्हान २१-१९, २१-१४ असे संपुष्टात आणले. पुरुषांच्या एकेरीत समीर वर्माला आपलाच सहकारी हर्षिल दाणी विरुद्ध २१-१५, २१-११ असा विजय मिळविताना थोडासा संघर्ष करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये हर्षिलने समीरला चांगली झुंज दिली.

मिश्र दुहेरीत सुमित रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवताना जॉकिम निल्सन व ख्रिस्तिना पेडरसन यांचा १९-२१, २१-१८, २१-१८ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला. अंतिम लढतीत त्यांना भारताच्याच प्रणव चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी उपांत्य सामन्यात मथायस ख्रिस्तियान्सन व सारा थिगेसन यांच्यावर २१-१८, २१-१३ असा विजय मिळवला. अश्विनीने महिलांच्या दुहेरीतही अंतिम फेरी गाठली. या जोडीने संजना संतोष व आरती सारा यांची घोडदौड १८-२१, २१-१२, २१-१३ अशी रोखली.