चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा

किदम्बी श्रीकांतची दुखापतीमुळे तर एच. एस. प्रणॉयची डेंग्यूमुळे माघार

जवळपास तीन आठवडय़ांपूर्वीच जगज्जेतेपद मिळवल्यानंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता नव्या जोमाने आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची भिस्त प्रामुख्याने सिंधूवरच असून पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला धूळ चारून कारकीर्दीत पहिल्यांदाच जगज्जेतेपद मिळवले होते. २४ वर्षीय सिंधूने सलग दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानल्यानंतर या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरल्याने संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षांव करण्यात आला.

पाचव्या मानांकित सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना चीनच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या ली झुरुइशी होणार आहे. २०१२मध्ये सिंधूने चीन मास्टर्स स्पर्धेत त्या वेळची ऑलिम्पिक विजेती ली झुरुइ हिला नमवून सर्वानाच आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. सिंधू आणि झुरुइ यांच्यात आतापर्यंत सहा सामने झाले असून दोघींनीही प्रत्येकी तीन वेळा बाजी मारली आहे.

२०१६मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या सिंधूने ली हिला पराभूत केल्यास दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान असू शकते. मिशेलवरही सरशी साधून सिंधूने उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास तिचा सामना चीनच्या चेन यू फेईशी होण्याची शक्यता आहे.

सिंधूव्यतिरिक्त सायना नेहवालकडूनही चाहत्यांना चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी आठवे मानांकन लाभलेल्या सायनाने दुखापतीमुळे इंडोनेशिया आणि थायलंड स्पर्धेतून माघार घेतली होती. जागतिक स्पर्धेत दुसऱ्या फेरीतून गाशा गुंडाळावा लागणाऱ्या सायनाचा पहिल्या फेरीत थायलंडच्या बुस्नान ओंगबाम्रुफनशी सामना रंगणार आहे.

पुरुष एकेरीत श्रीकांतने मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेसह कोरिया बॅडमिंटन स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. २६ वर्षीय श्रीकांतला यावर्षी फक्त इंडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यात यश आले होते. त्याव्यतिरिक्त त्याची कामगिरी निराशाजनकच झाली आहे.

श्रीकांतप्रमाणेच प्रणॉयसुद्धा डेंग्यू आजारामुळे दोन्ही स्पर्धाना मुकणार आहे. जागतिक स्पर्धेत प्रणॉयने जगज्जेत्या लिन डॅनला पराभूत करण्याची किमया साधली होती. परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्याला केंटो मोमोटाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

साईप्रणीत, कश्यप यांच्यावर नजरा

श्रीकांत आणि प्रणॉय यांच्या अनुपस्थितीत पुरुष एकेरीत जागतिक कांस्यपदक विजेता बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांच्यावर भारताची सर्वाधिक मदार आहे. साईप्रणीत थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसॅननविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. तर माजी राष्ट्रकुल विजेता कश्यपची फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेर्डेझशी पहिल्या सामन्यात गाठ पडणार आहे.

सात्त्विक-चिराग यांचे पुनरागमन

थायलंड स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारताच्या सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे पुनरागमन झाले आहे. सात्त्विकच्या खांद्याच्या दुखापतीमुळे जागतिक स्पर्धेतून या जोडीला माघार घ्यावी लागली होती. पहिल्या फेरीत या जोडीचा कॅनडाच्या जेसन अ‍ॅन्थोनी आणि नील याकुरा यांच्याशी सामना होणार आहे. याव्यतिरिक्त, मनू अत्री आणि सुमित रेड्डी ही जोडीही पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अश्विनी-सिक्की रेड्डीचा विजेतेपदाचा निर्धार

महिला दुहेरीत राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर भारताच्या आव्हानाची धुरा असून पहिल्या फेरीत त्यांच्यासमोर तैवानच्या चेंग चि आणि ली चेन यांचे आव्हान उभे ठाकणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हैदराबाद बॅडमिंटन स्पर्धेत या दोघींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

सात्त्विक-अश्विनीच्या हाती सूत्रे

मिश्र दुहेरीत सात्त्विक आणि अश्विनी या जोडीवर भारताची मदार असणार आहे. त्यांची पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाती ओकतावेंटी यांच्याशी झुंज रंगणार आहे. त्याशिवाय सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा या जोडीच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष असेल. त्यांचा जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि इसाबेल हेट्रिच यांच्याशी सामना होणार आहे.