वर्षअखेरीस झालेल्या मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपदाने आनंद झाला आहे. यंदाच्या वर्षांत माझी कामगिरी चांगली झाली आहे. पुढील वर्षांतही दमदार प्रदर्शन करीन, असा विश्वास युवा पी. व्ही. सिंधूने व्यक्त केला. जागतिक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आल्याने समाधान मिळाल्याचे तिने सांगितले.
अद्याप सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावता न आल्याबद्दल विचारले असता सिंधू म्हणाली, ‘प्रत्येक वेळी समान परिस्थिती नसते. विशिष्ट दिवशी तुमची कामगिरी कशी होते त्यावर बरेच काही ठरते. मलाही सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकवायचे आहे, लवकरच मी ते पटकावीन’.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेत स्थिरावण्यासाठी अथक परिश्रमांमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सिंधूने सांगितले. पुढील वर्षी सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
चीनच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूची पद्धत वेगवेगळी आहे. मात्र कोणत्याही विजयाने हुरळून जाणे उपयोगाचे नाही. चीनचे खेळाडू सातत्याने आपल्या खेळात सुधारणा करतात. सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही तर विजयापासून हिरावू शकतो, असे तिने सांगितले.