टोकियो : अत्यंत चांगल्या लयीत आणि ऐन बहरात खेळत असूनदेखील तीन स्पर्धामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पी.व्ही. सिंधूला  विजेतेपदाची आस लागलेली आहे.

मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी विजयाला गवसणी घालायचीच या निर्धारानेच सिंधू उतरणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत पोहोचूनही विजेतेपदापासून वंचित राहावे लागल्याचे शल्य तिच्या मनात आहे.या स्पर्धेतील  सिंधूची पहिली लढत जपानच्या सायाका ताकाहाशीसमवेत होणार आहे. दरम्यान सायना नेहवालने आणि पुरुषात बी. साईप्रणीतने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याने महिला गटात भारताच्या सर्व आशा सिंधूवरच केंद्रित अ्राहेत. पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत याची पहिली लढत चीनच्या हुआंग युझिआंगशी तर एच. एस. प्रणॉयची पहिली लढत इंडोनेशियाच्या जोनाथनसमवेत तर समीर वर्माचा सामना कोरियाच्या ली डॉँग केऊनशी होणार आहे.