उपांत्य लढतीत चेन यू फेईवर सहज मात; आज यामागुचीविरुद्ध अंतिम सामना

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिंधूने चीनच्या चेन यू फेईला पराभूत करून यंदाच्या वर्षांतील पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात सिंधूसमोर जपानच्या अकाने यामागुचीचे कडवे आव्हान असणार आहे.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने ऑल इंग्लंड स्पर्धेच्या विजेत्या यू फेईला फक्त ४६ मिनिटांत २१-१९, २१-१० असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. २४ वर्षीय सिंधूने या वर्षी सिंगापूर आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु दोन्ही वेळेस तिला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

एका महिन्याच्या विश्रांतीनंतर कोर्टवर परतलेल्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत नोझोमी ओकुहारासारख्या कडव्या प्रतिस्पर्धीचा पाडाव केल्यामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला होता. मात्र यू फेईने पहिल्या गेममध्ये सिंधूवर ७-४ असे वर्चस्व मिळवले. सिंधूने सलग पाच गुण मिळवत आघाडी घेतली. विशेषत: नेटजवळच्या फटक्यांचा तिने अप्रतिम वापर केला. तरीही पहिल्या गेमच्या मध्यंतराला यू फेईने ११-१० अशी निसटती आघाडी कायम राखली होती. त्यानंतर मात्र सिंधूने झुंजार खेळ करत १८-१८ अशी बरोबरी साधली. दडपणाच्या परिस्थितीत सिंधूने संयम बाळगून खेळ केला आणि यू फेईला चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे सिंधूला २१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकासह पहिला गेम जिंकता आला.

दुसऱ्या गेममध्ये चौथ्या मानांकित सिंधूने यू फेईला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. सलग सात गुण मिळवून सिंधूने यू फेईवर दबाव आणला; परंतु सिंधूचा एक फटका नेट ओलांडण्यात अपयशी ठरल्यामुळे यू फेईने गुणांचे खाते उघडले. सिंधूने मात्र मागे वळून न पाहता १६-८ अशी आघाडी मिळवली. स्मॅश, बॅकहँड यांसारख्या फटक्यांचा सिंधूने भडिमार करून यू फेईला निष्प्रभ केले. २०-१० अशी आघाडी असताना सिंधूने मारलेला एक फटका रेषेबाहेर जात असल्याचे भासल्यामुळे यू फेईने फटका न खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु रिप्लेमध्ये फटका रेषेच्या आत पडल्याचे निदर्शनास आले व सिंधूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

यामागुचीचा ताई झू यिंगला पराभवाचा धक्का

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीने चायनीज तैपईच्या ताई झू यिंगला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित यामागुचीने अग्रमानांकित झू यिंगचा फक्त तासाभरात २१-९, २१-१५ असा धुव्वा उडवला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठण्यात झू यिंगला अपयश आले.

१०-४ सिंधू आणि यामागुची आतापर्यंत विविध स्पर्धामध्ये १४ वेळा आमनेसामने आले असून सिंधूने यामागुचीला १० वेळा धूळ चारली आहे. तर यामागुचीला फक्त चार सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

यंदाचे वर्ष आतापर्यंत माझ्यासाठी फार आव्हानात्मक ठरले आहे. यू फेईविरुद्ध इतक्या सहज विजय प्राप्त होईल, अशी अपेक्षा केली नव्हती. अंतिम फेरीत यामागुचीला पराभूत करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन.     – पी. व्ही. सिंधू, भारताची बॅडमिंटनपटू