ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेचे अधिक दडपण न घेण्याचा निर्धार रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने केला आहे. ही स्पर्धा आपल्यासाठी इतर सुपर सीरिज स्पध्रेप्रमाणेच असेल, असे मत तिने व्यक्त केले. ७ ते १२ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

‘‘ऑल इंग्लंड ही स्पर्धा मी इतर सुपर सीरिज स्पध्रेप्रमाणेच समजते. या स्पध्रेच्या नावावरून ही खूप मोठी स्पर्धा असल्याचे लोक विचार करत असतील. मात्र एक खेळाडू म्हणून मला सुपर सीरिज स्पर्धामध्ये सामोरे जावे लागणाऱ्या खेळाडूंविरुद्धच येथे खेळायचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही स्पर्धा समान आहेत,’’ असे सिंधू म्हणाली.

सिंधूचे मार्गदर्शक आणि मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद आणि दिग्गज प्रकाश पादुकोण यांना ऑल इंग्लंड स्पध्रेचे जेतेपद पटकावण्यात यश आले आहे. २०१५साली सायना जेतेपदाच्या समीप आली होती, परंतु ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मारिनकडून तिला पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सिंधूने गेल्या काही वर्षांत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. २०१३च्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत सिंधूने कांस्यपदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. पुढच्याच हंगामात तिने विश्व अजिंक्यपद स्पध्रेत पुन्हा कांस्यपदक जिंकले. तसेच ऑलिम्पिक स्पध्रेत रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

‘‘या स्पध्रेसाठी मी सज्ज आहे आणि स्पध्रेतील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. प्रशिक्षण केंद्रात मी मुलांसोबत सराव केला आहे आणि आशा करते की त्याचा फायदा होईल. लक्ष्य गाठण्यासाठी दिवस-रात्र कसून सराव करत आहे,’’ असे सिंधूने सांगितले. ऑल इंग्लंडच्या पहिल्या फेरीत सिंधूला डेनमार्कच्या मेट्टे पोडल्सेनचा सामना करावा लागणार आहे.

सायना ऑलिम्पिक समितीचे प्रतिनिधित्व करणार

हैदराबाद : जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्लूएफ) खेळाडू आयोगावर भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची नियुक्ती झाली आहे. मागील वर्षी तिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) खेळाडू आयोगाचे प्रतिनिधित्व केले होते. आयओसीने याबाबतचे अधिकृत पत्र सायनाला पाठवले आहे. तसेच बीडब्लूएफच्या खेळाडू आयोगाने इतर सदस्यांनाही याबाबत कळवले आहे.

भारतीय खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा गौरव दुर्मीळच समजला जातो. गतवर्षी आयओसीच्या खेळाडू आयोगाचे सदस्यत्व सायनाला जाहीर करण्यात आले होते. दुखापतीतून सावरत असलेल्या सायनाला रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत पराभव पत्करावा लागला होता. मात्र तिने मागील महिन्यात मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद पटकावून दमदार पुनरागमनाचे संकेत दिले. जागतिक क्रमवारीत सायना सध्या १०व्या स्थानावर असून पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद तिला खुणावत आहे.

 

पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद

मुंबई : पुणे जिल्हय़ाने २१व्या राज्य अजिंक्यपद ग्रीकोरोमन कुस्ती स्पध्रेत सर्वसाधारण अंतिम विजेतेपद पटकावले. कोल्हापूर जिल्हय़ाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी अभिजित पाटील, विक्रम कुऱ्हाडे, प्रीतम खोत, अण्णासाहेब जगताप, अनिकेत खोपडे, किशोर नखाते, शैलेश शेळके आणि अक्षय शिंदे यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

आठ वजनी गटांमधील विजेतेपद पटकाविण्यासाठी चुरशीच्या अंतिम लढती वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात झाल्या. कोल्हापूरच्या अभिजितने (५९ किलो) मुंबई उपनगरच्या गोिवद यादवचा ८-० अशा तांत्रिक गुणांवर एकतर्फी विजय मिळविला.

कोल्हापूरच्या विक्रमने ६६ किलो वजनी गटात पुण्याच्या अरुण खेगलेचा सालतुक डाव साधत चीतपट केले. ७१ किलो वजनी गटामध्ये प्रीतमने बॅक थ्रो डावावर मुंबई उपनगरच्या गोकुळ यादवचे आव्हान संपुष्टात आणले. ७५ किलो वजनी गटात सोलापूरच्या अण्णासाहेबने चीतपट करून पुण्याच्या अक्षय मोडकवर मात केली.

पुण्याच्या अनिकेतने ८० किलो वजनी गटात पुणे शहराच्या शुभम गव्हाणेचा तांत्रिक गुणावर ८-० असा पराभव केला. ८५ किलो वजनी गटामध्ये िपपरी-चिंचवडच्या किशोरने ढाक डावावर पुण्याच्या विशाल भोईरचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. ९८ किलो वजनी गटाचा प्रथम क्रमांक पटकाविताना लातूरच्या शैलेशने जळगावच्या अतुल पाटीलला चीतपट केले. १३० किलो वजनी गटामध्ये बीडच्या अक्षयने सांगलीच्या शंकर मोहितेचा ८-० अशा तांत्रिक गुणांवर पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पध्रेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी ऑलिम्पिक कुस्तीपटू मारुती आडकर यांच्या हस्ते पार पडला.