प्रणॉय, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन विश्वातील मानाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पुरुष गटात मात्र किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या दिनार दायह ऑयुस्टीनवर २१-१२, २१-१४ अशी मात केली. आठव्या मानांकित सायनाने जर्मनीच्या फॅबीयन डीप्रेजवर २१-१८, २१-१० असा विजय मिळवला.

चीनच्या झाओ जुनपेंगने श्रीकांतवर २१-१९, १९-२१, २१-१२ अशी मात केली. पहिला गेम गमावल्यानंतरही श्रीकांतने जिद्दीने खेळ करत दुसरा गेम जिंकला आणि बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र झाओच्या झंझावाती खेळासमोर श्रीकांत निष्प्रभ ठरला. सातव्या मानांकित तिआन होऊवेईने प्रणॉयला २१-१३, २१-५ असे नमवले. सलामीच्या लढतीत तीन गेम्समध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवणाऱ्या प्रणॉयला गुरुवारी झालेल्या लढतीत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. दुहेरी प्रकारात कोरियाच्या यो येऑन सेआंग आणि किम हा ना जोडीने प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डी जोडीला २१-१९, २२-२० असे नमवले.

टेनिस : युकी भांब्री उपांत्यपूर्व फेरीत

झुहाई : भारताच्या युकी भांब्रीने पाचव्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत १४७ व्या स्थानी असलेल्या ब्लेझ कॅव्हसिसवर सरळ सेटमध्ये विजय मिहवून एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बिगरमानांकित भांब्रीने एक तास व १४ मिनिटे चाललेल्या लढतीत सर्बियाच्या ब्लेझवर ६-१, ६-४ असा विजय मिळवला.

फिफाचे पथक २१ मार्चला भारतात

नवी दिल्ली : १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या तयारीची अंतिम तपासणीसाठी फिफाचे पथक २१ ते २७ मार्च या कालावधीत भारतात येणार आहेत. सहा शहरांमध्ये या स्पध्रेचे सामने खेळवण्यात येणार असून तेथील स्टेडियच्या कामाची पाहणी हे पथक करणार आहे. जेमी यार्झा यांच्या नेतृत्त्वाखाली हे पथक २१ मार्चला नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी करेल आणि दुसऱ्या दिवशी सराव मैदानही पाहतील.