ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना, सिंधूचा पहिल्याच फेरीत पराभव

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या बॅडमिंटनपटूंना मलेशिया खुली सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दोन अव्वल खेळाडूंच्या पराभवाने बॅडमिंटन क्षेत्राला धक्काच बसला आहे.

सिंधूने गेल्या आठवडय़ात ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेत्या कॅरोलिन मारिनला नमवून इंडियन खुल्या सुपर सीरिज स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे मलेशियातही तिच्याकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती. परंतु चीनच्या बिगरमानांकित चेन युफेई हिने रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूवर १८-२१, २१-१९, २१-१७ असा सनसनाटी विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत चिनी खेळाडूने एक तास व आठ मिनिटांत सहाव्या मानांकित सिंधूवर मात केली.

ऑलिम्पिक कांस्यपदक  विजेत्या सायनाला जपानच्या अ‍ॅकेन यामागुचीने पराभूत केले. चौथ्या मानांकित जपानच्या खेळाडूने १९-२१, २१-१३, २१-१५ अशा फरकाने अवघ्या ५६ मिनिटांत बाजी मारली. इंडियन खुल्या स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूकडून पराभूत झालेल्या सायनाची संघर्षमय वाटचाल येथेही सुरू राहिली. जपानच्या खेळाडूने सायनावर पहिल्या सेटपासून वर्चस्व गाजवले, परंतु भारतीय खेळाडूने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या जपानच्या खेळाडूने झोकात पुनरागमन करताना सायनाला हतबल केले आणि पुढील दोन्ही सेट जिंकून सायनाचे आव्हान संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीत भारताच्या अजय जयरामने सकारात्मक सुरुवात केली. त्याने चीनच्या क्वियो बीनवर २१-११, २१-८ असा विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी त्याला ३१ मिनिटांचाच खेळ करावा लागला. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमिथ रेड्डी यांना मात्र पराभव पत्करावा लागला. चायनीज तैपेईच्या लिओ कुआन हाओ आणि लू चीया पिन या जोडीने १८-२१, २१-१८, २१-१७ असा विजय मिळवत अत्री-रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात आणले.

डेव्हिस चषक लढतीसाठी पेसचा कसून सराव

बेंगळूरु : दुहेरीतील खेळाडूंची नावे अद्याप निश्चित झालेली नसली, तरी भारताचा अनुभवी खेळाडू लिएण्डर पेसने डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी कसून सराव केला. भारत व उझबेकिस्तान यांच्यात शुक्रवारपासून येथे ही लढत सुरू होत आहे.

पेसने भारतीय संघाचे प्रशिक्षक झिशान अली यांच्या उपस्थितीत युवा खेळाडूंबरोबर सराव केला. या सरावात त्याने प्रामुख्याने फोरहँड व बॅकहँड फटक्यांवर लक्ष केंद्रित केले होते. सरावानंतर पेस म्हणाला, ‘‘डेव्हिस लढत ही माझ्यासाठी नेहमीच प्रतिष्ठेची स्पर्धा असते व मी नेहमीच तेथे सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. येथे सराव केल्यानंतर मला खूप बरे वाटले.’’

पेसने मेक्सिकोतील लिऑन येथे झालेल्या चॅलेंजर स्पर्धेत कॅनडाच्या आदिल शमसद्दीनच्या साथीने दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. या मोसमातील त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. पेस व आदिल यांनी अंतिम लढतीत लुका मार्गारोली (स्वित्र्झलड) व कालो झम्पेरी यांच्यावर ६-१, ६-४ अशी सरळ सेट्समध्ये मात केली.