भारताला आशियाई बॅडमिंटनमध्ये प्रथमच महिला एकेरीचे पदक निश्चित

भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या दोघींनी आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दोघींची पदके निश्चित असून उपांत्य फेरीचे सामने जिंकले तर त्या दोघी अंतिम फेरीत एकमेकींसमोर येण्याची शक्यता आहे.

सायना नेहवालने तिच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या रॅचनोक इन्तॅनोनला अवघ्या ४२ मिनिटांत २१-१८, २१-१६ असे पराभूत केले. सायनाने अत्यंत आक्रमकपणे खेळ करत संपूर्ण सामन्यावर नियंत्रण राखले. रॅचनोकसारख्या प्रमुख खेळाडूला सायनाने सहज दोन गेममध्ये पराभूत केले. उपांत्य फेरीत सायनाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताई झू यिंगशी झुंजायचे आहे. त्यानंतर सिंधूने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या निचाओन जिंदापोलला पराभूत केले. मात्र, त्यासाठी सिंधूला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. हा सामना सिंधूने २१-११, १६-२१, २१-१४ असा जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे.  सिंधूला जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावरील अकाने यामागुचीशी लढावे लागेल.

एकेरीत एकमेव पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला बॅडमिंटन या खेळात एकूण आठ पदके मिळाली आहेत. मात्र त्यातील सहा पदके ही सांघिक आणि एक पदक पुरुष दुहेरीतील आहेत, तर एकेरीतील एकमेव पदक हे १९८२ साली दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सय्यद मोदीने पुरुष एकेरीत पटकावले होते.

भारताला महिला एकेरी बॅडमिंटनमधील पदक निश्चित झाले, याचा आनंद आहे. मात्र त्यावर मी समाधानी नाही. उपांत्यपूर्व सामन्यात मला चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यामुळे यापुढील लढतींमध्ये अधिक सफाईदारपणे खेळ करून सर्वोच्च म्हणजे सुवर्णपदकच मिळवण्यासाठी प्रयास करणार आहे. सायना आणि मी असे दोन्ही भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले, हे पाहायला सर्वच भारतीयांना निश्चितच आवडेल. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.  – पी. व्ही. सिंधू

 

सर्जूबालाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

माजी जागतिक रौप्यपदक विजेत्या सर्जूबाला देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिची दमदार वाटचाल कायम राखत बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष गटातील प्रमुख बॉक्सर मनोज कुमार आणि शिवा थापा यांनी निराशा केली.

फ्लायवेट ५१ किलो वजनी गटात खेळणाऱ्या भारताच्या सर्जूबालाने ताजिकीस्तानच्या मदिना घाफोरावाचा ५-० असा पराभव केला. सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. मात्र पुरुषांच्या गटात ६९ किलो वजनी गटात भारताच्या मनोज कुमारला किरगिझस्तानच्या अब्दुरखमान अब्दुरखमॅनोवकडून पराभव पत्करावा लागला, तर ६० किलो वजनी गटात चीनच्या जुन शॅनकडून शिवा थापाला अपयशाचा सामना करावा लागला.