नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूसमवेत चीनच्या लि निंग या क्रीडाविषयक कंपनीने ५० कोटी रुपयांचा करार केला आहे.

भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याच्यासमवेतही गेल्या महिन्यात याच लि निंग कंपनीने ३५ कोटी रुपयांचा करार केला होता. त्यानंतर आता सिंधूशी ५० कोटींच्या रकमेचा करार करण्यात आला आहे. चार वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारानुसार ४० कोटींची रक्कम सिंधूला थेट तर १० कोटी रुपये क्रीडा साहित्याच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. सध्याची भारतीय बॅडमिंटनची सर्वाधिक यशस्वी जोडी मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांच्याशी प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा तर पी. कश्यपशी ८ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.  प्युमा कंपनीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासमवेत २०१७ साली ८ वर्षांकरीता १०० कोटींचा करार करण्यात आला होता. त्या कराराशी सिंधूच्या कराराची बरोबरी असल्याचे मानले जात आहे.

सिंधूचे पूर्वीचे करार : ’ लि निंग कंपनीने २०१४-१५ मध्ये वार्षिक एक कोटी, २५ लाख रुपये रकमेवर दोन वर्षांसाठी करारबद्ध केले होते.

’ २०१६ पासून योनेक्सचा वार्षिक ३.५ कोटी रकमेचा तीन वर्षांचा करार.