पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात शनिवारी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. मागील राष्ट्रीय विजेतेपदाची लढतसुद्धा या दोघींमध्येच रंगली होती.

उपांत्य सामन्यात सिंधूने आसामच्या १९ वर्षीय अश्मिता चालिहाचा २१-१०, २२-२० असा पराभव केला, तर सायनाने नागपूरच्या वैष्णवी भोलला २१-१५, २१-१४ असे पराभूत केले. सायना व सिंधू यांच्यात गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्णपदकाची लढत रंगली होती. सायनाने २००६, २००७ व २०१८मध्ये राष्ट्रीय विजेतेपद मिळववले आहे, तर सिंधूने २०११ व २०१३मध्ये स्पर्धा जिंकली आहे.

‘‘माझ्यासाठी हा फक्त आणखी एक सामना असल्यामुळे तितक्याच गांभीर्याने लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम कामगिरी करीन. ऑल इंग्लंड स्पर्धेच्या दृष्टीने त्याची मदत होईल, याबाबत मी विचार केलेला नाही,’’ असे सिंधूने सांगितले. पुरुष एकेरीत सौरभ वर्माने मुंबईच्या कौशल धर्मामीरला २१-१४, २१-१७ असे ४४ मिनिटांत नामोहरम करीत अंतिम फेरी गाठली.