थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मंगळवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे आता दोन स्पर्धानंतर पुनरागमन करणाऱ्या अनुभवी सायना नेहवालवर महिला एकेरीत भारताची भिस्त असणार आहे. याव्यतिरिक्त, सौरभ वर्मा आणि साई उत्तेजिता यांनी मंगळवारी पात्रता फेरीचे सामने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला जपान बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. दोन्हीकडे सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीनेच पराभूत केले होते. मात्र थायलंड बॅडमिंटन स्पर्धेतून सिंधूच्या माघारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसरीकडे सलग दोन स्पर्धाना मुकणारी सायना बुधवारपासून तिच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. इंडोनेशिया आणि जपान स्पर्धेतून २९ वर्षीय सायनाला दुखापतीच्या कारणास्तव माघार घ्यावी लागली होती. जानेवारीत झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाने उपविजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मात्र तिच्या पदरी निराशाच पडली असल्याने या स्पर्धेत सिंधूच्या अनुपस्थितीत सायना भारताच्या आव्हानाची धुरा कशाप्रकारे सांभाळते, हे पाहणे रंजक ठरेल. स्पर्धेच्या मुख्य फेरीला बुधवारपासून सुरुवात होणार असून पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत, बी साईप्रणीत, एच एस प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

दरम्यान, पात्रता फेरीतील पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सौरभने थायंलडच्या कंतावत लीलावेचबुतला २१-१८, २१-१९ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात सौरभने चीनच्या झो क्यूला ११-२१, २१-१४, २१-१८ असे पिछाडीवरून नमवले. मात्र भारताचा अजय जयराम मुख्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. झो क्यूनेच जयरामला २१-१६, २१-१३ अशी धूळ चारली.

महिलांमध्ये उत्तेजिताने कॅनडाच्या टॅम ब्रिटनीवर १६-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला. उत्तेजिता आणि सायना आता महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.