भारताचा अव्वल टेनिसपटू लिएण्डर पेस आपल्या दोन दशकांच्या यशस्वी टेनिस कारकीर्दीनंतर आता निवृत्तीकडे झुकला आहे. त्यामुळे कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल द्रविड आणि पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रेरणा घेत देशात ऑलिम्पिक पदकविजेता अथवा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू घडवण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे मत पेसने व्यक्त केले.

पुण्यात सुरू असलेल्या टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेदरम्यान पेसने आपल्या भविष्यातील योजनांविषयी जाहीरपणे मत मांडले. तो म्हणाला, ‘‘द्रविड आणि गोपीचंद यांनी आपापल्या खेळांमध्ये दर्जेदार खेळाडू घडवले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मला चांगले टेनिसपटू घडवायचे आहेत. आता मला माझ्या दुसऱ्या पर्वाची उत्सुकता लागून राहिली आहे. मी घडवलेल्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये अथवा ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये देशाला पदक मिळवून द्यावे, हेच माझे यापुढील स्वप्न आहे.’’

‘‘द्रविड, गोपीचंद या भारताच्या माजी खेळाडूंनी युवा पिढीला सर्वोच्च आणि आधुनिक प्रशिक्षण देत अनेक खेळाडू तयार केले आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या अभावी २००१मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या गोपीचंदने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बॅडमिंटनची प्रतिभा जोपासली नाही तर दोन ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडूही घडवले. द्रविडनेही निवृत्तीनंतर युवा खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे खेळाडू आता वरिष्ठ पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत,’’ असे पेस म्हणाला.

‘‘इंडियन प्रीमियर लीग, प्रीमियर बॅडमिंटन लीग, अल्टिमेट टेबल टेनिस लीग यांसारख्या स्पर्धाप्रमाणेच टेनिसमध्येही व्यावसायिक लीग आयोजित करण्याची आवश्यकता आहे. टेनिसमध्येही आता बदल घडवून आणण्याची गरज आहे,’’ असेही पेस म्हणाला.

वेसली, बेरांकिस उपांत्य फेरीत

पुणे : पुरुषांच्या एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेसली याने बेलारूसच्या इल्या इवाश्का याचा पराभव करत टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.  २ तास ३० मिनिटे रंगलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात वेसली याने २-६, ६-२, ७-६ (११) असा विजय मिळवत विजयी घोडदौड कायम ठेवली. पहिला सेट इवाश्काने जिंकल्यानंतर जोमाने पुनरागमन करत वेसली याने पुढील दोन्ही सेट जिंकून आगेकूच केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात लिथुआनियाच्या दुसऱ्या मानांकित रिचर्डस बेरांकिस याने जपानच्या पाचव्या मानांकित यूची सुगिता याला ४-६, ७-६ (४), ६-२ असे हरवून उपांत्य फेरीत मजल मारली.