प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल पद्म आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना पद्म आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र या सर्वांमध्ये पिंपरी-चिंचवडच्या मुरलीकांत पेटकर यांची कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी आहे. पेटकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत सामील झालेले मुरलीकांत सुरुवातीला बॉक्सिंग खेळायचे. मात्र १९६५ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले. मात्र मुळातच लढवय्या स्वभावाचे असलेल्या पेटकर यांनी हार मानली नाही. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन पेटकर यांनी बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यानंतर आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत पहिलं सुवर्णपदकही मिळवून दिलं.

मुरलीकांत पेटकर यांचा सुरुवातीचा प्रवास रंजकच आहे. मुरलीकांत यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ रोजी इस्लामपूर येथे झाला. मुळचे सांगलीचे असणारे पेटकर हे १९७९ सालपासून पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले. मुरलीकांत पेटकर आपल्या लहान वयात गावाकडे कुस्ती खेळायचे. यावेळी गावातील एका घरंदाज खेळाडूला धोबीपछाड दिला, यानंतर पेटकर यांना गाव सोडून पुण्यात आपल्या आत्त्याकडे यावं लागलं. यानंतर काही वर्षांनी पेटकर सिकंदराबाद येथे बॉइज बटालियन लष्करात भरती झाले. १९६० साली पेटकर लष्कराच्या संघाकडून हॉकी खेळत होते. मात्र काही कारणामुळे त्यांनी १९६४ साली बॉक्सिंगकडे मोर्चा वळवला.

१९६५ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पेटकर यांना गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर पेटकर ३ महिने कोमात होते. शत्रुच्या या भ्याड हल्ल्यात पेटकर यांना कायमचं अपंगत्व आलं. मात्र जलतरणाने पेटकर यांना जगण्याची नवीन उमेद दिली.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पेटकर यांनी मिळवलेली पदकं

 

पद्म पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर पेटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय

१९७२ ला जर्मनी येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर जलतरणसाठी ३७.३३ सेकंदाच जागतिक विक्रम करत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक ही पटकावले. १९७५ साली पेटकर यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत केलं. “मला गोळ्या लागल्या तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी लष्करातील सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी लवकर बरा झालो.” लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना पेटकर यांनी आपल्याला जुन्या काळातली आठवणींना उजाळा दिला. पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने सध्या पेटकर यांच्या परिवारात आनंदाचं वातावरण आहे.