News Flash

मुंबईच्या क्रिकेटसाठी अभिमानास्पद क्षण

गुरुवारपासून सुरू होणारा रणजी करंडक क्रिकेट सामना हा मुंबईचा पाचशेवा सामना असणार आहे.

पद्माकर (पॅडी) शिवलकर  मुंबईचे माजी फिरकीपटू

मुंबईच्या क्रिकेटला वैभवशाली परंपरा आहे. एकेकाळी भारताच्या संघात मुंबईच्या खेळाडूंचाच प्रामुख्याने समावेश असायचा. विजय र्मचट, पॉली उम्रीगर, अजित वाडेकर, विजय मांजरेकर, दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंनी मुंबईकरांना अविस्मरणीय, अद्भुत असे अवीट आनंदाचे अनेक क्षण दिले. ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मुंबईचा संघ आपला पाचशेवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या ऐतिहासिक पाचशेव्या सामन्याचे औचित्य साधून मुंबईच्या माजी खेळाडूंशी प्रकट केलेले मनोगत-

गुरुवारपासून सुरू होणारा रणजी करंडक क्रिकेट सामना हा मुंबईचा पाचशेवा सामना असणार आहे. हा मुंबई क्रिकेटसाठी अतिशय अभिमानाचा दिवस असेल. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटचे आपलेपण जपलेल्यांनी तो साजरा करण्यासारखाच क्षण असेल. मुंबईच्या क्रिकेटने जे काही केले किंवा जो काही इतिहास लिहिला गेला, तो फक्त खेळाडूंच्या संघाला जिंकून देण्याच्या ईष्रेतून घडला आहे.

मुंबईच्या क्रिकेटची आजची वाटचालही त्याच विजयी आवेशाचे प्रतीक आहे. आपल्या खेळाडूंनी मोठे व्हावे, देशाचे प्रतिनिधित्व करावे, असे आजही आम्हा प्रत्येकाला वाटते. मुंबईच्या वर्चस्वाचा एक काळ होता; परंतु आता अन्य राज्यांचे संघसुद्धा ताकदीने उतरायला लागले आहेत. त्यामुळे हे आव्हान पेलून रणजी करंडक स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छाच असतील.

दरवर्षीच्या रणजी करंडक सामन्यांमध्ये मुंबईचा खडूसपणा दिसून येतो. पहिल्या डावात पिछाडीवर पडूनही दुसऱ्या डावात फिनिक्सप्रमाणे भरारी घेण्याची त्यांची वृत्ती हे त्यांच्या झुंजारपणाचेच द्योतक आहे. मी मुंबईसाठी प्रथमच खेळलो, तेव्हा पंचविशीचा होतो. त्याच्यानंतर दोन वर्षे राखीव म्हणून होतो, मग पुन्हा संघात आलो. माझ्या वयाच्या ४८व्या वर्षी पुनरागमन करण्याचे भाग्य मला लाभले. १९७१च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई-महाराष्ट्र अंतिम सामन्याची आठवण सांगायला मला आवडेल. त्या वेळी अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला होता. मुंबईचे सहा खेळाडू तेव्हा संघात नव्हते. त्यामुळे संघ कमकुवत झाला होता. सुधीर नाईक त्या वेळी मुंबईचे आणि चंदू बोर्डे महाराष्ट्राचे कर्णधार होते. त्या वेळी दुसऱ्या डावात मला सहा बळी मिळाले आणि मुंबईला विजेतेपद मिळाले. या सामन्यानंतर माझे मुंबईच्या संघातील स्थान स्थिर झाले. तेव्हापासून निवड समिती संघ निवडताना प्रथम कर्णधाराचे नाव आणि अकरावे माझे नाव लिहायचे, त्यानंतर बाकीच्या खेळाडूंची नावे निश्चित व्हायची. रोहटकला झालेल्या मुंबई-हरयाणा सामन्याचाही किस्सा असाच रंगतदार आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील हरयाणाच्या संघात राजिंदर गोयलचा समावेश होता. त्या सामन्यात मुंबईने डावाने विजय मिळवला. दिलीप वेंगसरकरने तर मैदानावर नांगर टाकला होता. त्या खेळपट्टीवर चेंडू हातभर वळायचा. अशा परिस्थितीत ८० धावा काढणारी दिलीपची खेळी ही त्रिशतकाच्या तोडीची वाखाणण्याजोगी होती. मात्र मुंबईच्या संघसहकाऱ्यांना विश्वास होता की, पॅडी आहे. कपिलने मीसुद्धा दिलीपसारखा खेळपट्टीवर चिवट झुंज देईन, असे संघाला सांगितले होते; पण बचाव करताना एका चेंडूने त्याचा घात केला आणि त्याचा बळी मला मिळाला.४८व्या वर्षी पुनरागमन हे  कठीण मानले जाते. मात्र त्याची वस्तुस्थिती अशी होती की, दिलीप वेंगसकरने हे निश्चित केले होते की, पॅडी मुंबईच्या संघात हवा. मी त्याला म्हटले, आता आहेत आपल्याकडे चांगले गोलंदाज; परंतु त्याने माझे काहीच ऐकून घेतले नाही. पॅडी, तुला खेळायचे आहे, असे ठणकावून सांगितले. अशोक मंकडने मला तू नाही सांग, असे बजावले; पण मी त्याला स्पष्ट केले की, माझ्या मुंबईच्या संघाचे हे बोलावणे आहे. हे मी कसे टाळू? मुंबईकडे गोलंदाज नसल्यामुळे त्यांना वाटते की, मी गोलंदाजी करू शकतो.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 5:46 am

Web Title: padmakar shivalkar view on mumbai 500th ranji game
Next Stories
1 खडूसपणा इथूनच आला!
2 भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान महत्वाचे
3 ‘हेडमास्टर’ हा शिक्का प्रशिक्षकपदाच्या उत्तरार्धातील कारकीर्दीत बसला!
Just Now!
X