भारताच्या पद्मिनी राऊत व पी. व्ही. नंदिता यांनी शानदार विजय मिळवत जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीत कौतुकास्पद कामगिरी केली. मुलांमध्ये भारताचा दीप्तायन घोषने तृतीय मानांकित कोरी जॉर्जला बरोबरीत रोखले.
मुलांच्या गटात चीनच्या वेई येई व लु शांगलेई यांनी रशियाच्या व्लादिमीर फेदोसोवच्या साथीने संयुक्त आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर त्यांचे प्रत्येकी सात गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या सात खेळाडूंमध्ये भारताच्या अरविंद चिदम्बरम व दीप्तायन घोष यांचा समावेश आहे. त्यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले आहेत. मुलींमध्ये रशियाच्या अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याश्किना हिने एकटीने आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर तिचे साडेसात गुण झाले आहेत. इराणची सारस्दात खादेमलशेरी हिने सात गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. भारताच्या पद्मिनी राऊत व पी.व्ही.नंदिता यांनी अन्य तीन खेळाडूंसह तिसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले आहेत. त्यांना पदक मिळविण्याची संधी असून उर्वरित चार फेऱ्यांमध्ये त्यांना अव्वल दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे. नंदिती हिच्याबरोबरच प्रत्युषा बोड्डा व दारिया पुस्तोवोतोवा यांचा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा निकष पूर्ण झाला.