जगज्जेतेपदासाठीचा दावेदार विदिथ गुजराथीसह अंकित राजपारा व इव्हाना फुर्टाडो या भारतीय खेळाडूंना जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. मात्र पद्मिनी राऊतने शानदार विजयासह संयुक्त आघाडी कायम राखली आहे.
या स्पर्धेत भारताच्या सुनीलद्यूत नारायणने मुलांच्या गटात कोरी जॉर्ज (पेरू), मिखाइल अन्तीपोव (रशिया) व लुई शांगलेई (चीन) यांच्यासह संयुक्त आघाडी मिळविली आहे. सहाव्या फेरीअखेर त्यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताच्या सहज ग्रोव्हर याच्यासह नऊ खेळाडू असून त्यांचे प्रत्येकी ४.५ गुण झाले आहेत. मुलींमध्ये पद्मिनी राऊत व रशियाची दारिया पुस्तोवोतोव्हा या संयुक्त आघाडीवर आहेत. त्यांचे प्रत्येकी पाच गुण आहेत. दुसऱ्या स्थानावरील आठ खेळाडूंमध्ये भारताच्या पी. व्ही. नंदिताचा समावेश आहे. त्यांचे प्रत्येकी ४.५ गुण झाले आहेत.
विदिथला नॉर्वेच्या टेरी आर्यनकडून पराभव पत्करावा लागला. विदिथचा सहकारी अंकितला अझरबैजानच्या उल्वी बजारोनीने हरविले. अनपेक्षित कामगिरीची मालिका राखणाऱ्या सुनील नारायणने रशियाच्या व्लादिमीर फेदोसोव्हला बरोबरीत रोखले. सहज ग्रोव्हरने चीनचा बलाढय़ खेळाडू वेई येईला बरोबरीत रोखले. सुनील व सहज यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. भारताच्या सांतायन दासने नेदरलँड्सच्या व्हान रॉबिन काम्पेनला बरोबरीत रोखले.
मुलींमध्ये रशियाच्या दारिया पुस्तोवोतोव्हाने भारताच्या इव्हाना फुर्टाडोला ३७ चालींमध्ये पराभूत केले.  पद्मिनीने दोन हत्तींच्या साहाय्याने सुरेख खेळ करत रुमानियाच्या गेलीप लोआना हिच्याविरुद्ध ३८ चालींमध्ये उल्लेखनीय विजय मिळविला.