जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये यश मिळवण्यासाठी मी खूप मेहनत करणार आहे. हे स्वप्न मी निश्चित साकार करीन, असा आत्मविश्वास महिलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेती पद्मिनी राऊतने व्यक्त केला.
ओदिशाच्या पद्मिनीने कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेतील ११ फेऱ्यांपैकी दहाव्या फेरीतच अन्य खेळाडूंपेक्षा एक गुणाने आघाडी घेत विजेतेपद निश्चित केले होते. गतवर्षीही राष्ट्रीय स्पर्धेत तिला विजेतेपद मिळाले होते. याबाबत पद्मिनी म्हणाली, ‘‘विजेतेपद मिळविण्यापेक्षा ते टिकवणे खूप अवघड असते. यंदा प्रथम क्रमांक मिळविण्याची मला खात्री होती; परंतु तिसऱ्या फेरीत प्रत्युषा बोड्डाकडून पराभव स्वीकारल्यानंतर माझ्यापुढील आव्हान वाढले होते. सुदैवाने त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत मी सातत्यपूर्ण यश मिळवत गेले. अर्थात या विजेतेपदावर मी समाधानी नाही. या स्पर्धेत मला दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही वेळा वेळेच्या बंधनात चाली करण्याबाबत मी कमी पडले, याची जाणीव मला आहे.’’
‘‘जागतिक, राष्ट्रकुल व आशियाई या तीनही स्पर्धामध्ये मला पुढील वर्षी भाग घेण्याची संधी मिळणार आहे. तेथे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील दोन डावांमध्ये आपण कोठे कमी पडलो याचा मी बारकाईने अभ्यास करीत आहे. या आर्थिक वर्षांत ग्रँडमास्टर किताबाचे उर्वरित निकष पूर्ण करण्यावर मी भर देत आहे. त्याचप्रमाणे मानांकन गुणात वाढ करण्यासाठी आणखी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यावर माझा
भर राहील,’’ असेही पद्मिनीने सांगितले.