भारतीय टेनिसच्या विकासासाठी महान टेनिसपटू बोरिस बेकर यांची अपेक्षा

मोनॅको : भारतातील टेनिसपटूंची गेल्या काही वर्षांतील कामगिरी फारशी प्रभावी झालेली नाही. नामांकित खेळाडूंचे आपापसात सुरू असलेले मतभेद हे यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे टेनिसच्या विकासासाठी महेश भूपती, लिएण्डर पेस, सानिया मिर्झा यांनी एकत्र यावे, अशी प्रतिक्रिया जर्मनीचे महान टेनिसपटू बोरिस बेकर यांनी व्यक्त केली.

बेकर म्हणाले, ‘‘गेल्या तीन दशकांत भारताला एकेरीत एकही अव्वल दर्जाचा खेळाडू घडवता आलेला नाही. विशेषत: पेस, भूपती, सानिया यांसारखे खेळाडू दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात टेनिस फार लोकप्रिय आहे, मात्र टेनिसच्या विकासासाठी या त्रिमूर्तीने एकत्र येणे अत्यावश्यक आहे.’’

पेस-भूपती यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्याशिवाय पेस व सानिया यांच्यासह खेळण्यासाठी दुहेरीत जोडीदारही सहजपणे लाभत नाही. यामुळेच पेसने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. ‘‘सध्याच्या घडीला भारतात प्रज्ञेश गुणेश्वरन व अंकिता रैना यांसारखे प्रतिभावान टेनिसपटू नक्कीच आहेत, मात्र कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची कमतरता त्यांच्यात जाणवते. त्याशिवाय भारतातील पायाभूत सुविधांवर कशा प्रकारे टेनिसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, याकडे या तीन अनुभवी खेळाडूंनी लक्ष दिले पाहिजे,’’ असे बेकर म्हणाले.

‘‘नोव्हाक जोकोव्हिच कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत आहे. त्याला रॉजर फेडररचा २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. फेडरर नेहमीच एक महान टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. महिलांमध्ये नाओमी ओसाका, सिमोना हालेप यांच्यात दीर्घकाळ वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे,’’ असे मत बोरिस बेकर यांनी विद्यमान टेनिसपटूंविषयी व्यक्त केले.