लिएण्डर पेसने स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन भूमीवर रविवारी तिरंगा फडकावला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद काबीज करताना पेसने आपल्या कारकीर्दीतील १५व्या ग्रॅण्ड स्लॅमवर मोहर उमटवली.
सातव्या मानांकित पेस-हिंगिस जोडीने तिसऱ्या मानांकित डॅनियल नेस्टर आणि क्रिस्तियाना म्लादेनोव्हिक जोडीला एक तास दोन मिनिटांत ६-४, ६-३ असे सहज नामोहरम केले.
४१ वर्षीय पेसच्या कारकीर्दीतील हे सातवे मिश्र दुहेरीचे विजेतेपद आहे, तर हिंगिसने ११व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले. हिंगिसच्या खात्यावर पाच एकेरी ग्रॅण्ड स्लॅमसुद्धा जमा आहेत. यापैकी १९९७, ९८ आणि ९९ अशा तीन वेळा ऑस्ट्रेलियन जेतेपदाला तिने गवसणी घातली आहे.
दुहेरीत खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या पेसने ३४ वर्षीय हिंगिससोबत नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केले. हिंगिसने एके काळी आपल्या लाजवाब खेळाने सर्वाना मोहिनी घातली होती. एकेरीतील कारकीर्दीचा अस्त झाल्यानंतर आपली आदर्शवत खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा हिच्या सल्ल्याचा आदर करीत मिश्र दुहेरीत पेससोबत खेळण्याचा निर्णय घेतला.
पेसने नवरातिलोव्हाच्या साथीने २००३मध्ये ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद विजेतेपद मिळवण्याची किमया साधली होती. तीसुद्धा पेस आणि हिंगिसला पाठबळ देण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती.
पेसच्या साथीने खेळण्याचा सल्ला देणाऱ्या मार्टिना नवरातिलोव्हाची मी अत्यंत आभारी आहे. मी पुन्हा हे स्वप्नवत जेतेपद जिंकू शकले, यावर माझा अद्याप विश्वास बसत नाही. – मार्टिना हिंगिस