लिअँडर पेस आणि मार्टिना हिंगिस जोडीने आॅस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीये. या फेरीत पोचायला त्यांनी आॅस्ट्रेलियाच्याच मॅट रीड आणि कॅसी डेलाक्वा यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला. फक्त ५४ मिनिटात त्यांनी रीड-डेलाक्वा जोडीचा ६-२,६-३ असा फडशा पाडला.

लिअँडर पेस आणि मार्टिना हिंगिस ही एक ‘एजलेस’ जोडी मानली जाते. लिअँडर पेसविषयी भारतीयांना जास्त काही सांगण्याची गरज नाही. भारताच्या अव्वल टेनिस प्लेअर्सपैकी एक असलेल्या लिअँडरने त्याचं हे स्थान गेली दोन दशकं कायम ठेवलंय. एका खेळाडूसाठी हा एक मोठा विक्रम आहे. सात आॅलिंपिक्स खेळणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. पेस दुहेरी आणि मिश्र दुहेरी टेनिस प्रकारांमध्ये जगातल्या सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडूंमध्ये गणला जातो. १९९८ च्या अटलांटा आॅलिंपिक्समध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या पेसने एकेकाळी गोरान इव्हानेसेविच आणि पीट सँप्रससारख्या अव्वल खेळाडूंना नमवण्याची प्रचंड मोठी कामगिरी केली आहे.

स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसबद्दलही काही वेगळं सांगायला नको. महिला टेनिसची एकेकाळची सम्राज्ञी असणारी मार्टिना महिला एकेरीमध्ये अव्वल मानांकित होती. एकेरीमधून निवृत्त झाल्यावर दुहेरीतही तिने आपला जबरदस्त खेळ कायम ठेवत टेनिसविश्वातला दबदबा कायम ठेवला आहे.

अशा या दोघा खेळाडूंपुढे रीड आणि डेलाक्वा या आॅस्ट्रेलियन जोडीचा निभाव लागण्याची शक्यता कमीच होती. मॅचही अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाली.

वाचा – “अरे साॅरी, कॅप्टन तू आहेस नाही का?”

पहिल्याच सेटमध्ये पेस आणि हिंगिसने कॅसी डेलाक्वाची सर्व्हिस भेदत सेटमध्ये आघाडी घेतली. यानंतर पुन्हा डेलाक्वाची सर्व्हिस भेदत पेस- हिंगिसने पहिला सेट ६-२ न खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्येही पेस-हिंगिस जोडीने आपला खेळाचा दर्जा कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांना डोकं वर काढायची संधी मिळू दिली नाही आणि  सेटवर ६-३ असा कब्जा करत मॅच जिंकली.

या मॅचमध्ये मार्टिना आणि पेसमध्ये उत्कृष्ट कोआॅर्डिनेशन पाहायला मिळालं. मार्टिनाने बेसलाईनवर उत्तम खेळ केला तर पेसने त्याच्या नेट गेमच्या जोरावर बरेच पाॅईंट्स मिळवले.

पेस-हिंगिस जोडी आता उद्या होणाऱ्या क्वार्टरफायनलमध्ये काय करते याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.