दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या वन-डे मालिकेचा दुसरा सामना वादात सापडला आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान 193 धावांवर धावबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने फखरला चुकीच्या पद्धतीने बाद केले, अशी चर्चा रंगत आहे.

मात्र, या घटनेबद्दल फखरने स्वत: ला दोषी ठरवले आहे. तो म्हणाला, ”चूक माझीच होती. मी दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या हारिस रौफकडे बघत होतो. मला वाटले, की त्याने धाव घेताना उशीर केला. बाकी मॅच रेफरीवर अवलंबून आहे. पण, मला क्विंटनची यात चूक असल्याचे वाटत नाही.”

 

पाकिस्तान विरुद्द दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये पाकिस्तानचा सलामीवर फखर झमान याने 155 चेंडूंमध्ये 193 धावांची दमदार खेळी केली. मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर 17 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. द. आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात 341 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानच्या संघाला 324 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानच्या खेळीमध्ये फखर जमानचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले.

फखरचा विक्रम

5 जानेवारी 1971 रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फखर जमान हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. फखरच्या अगोदर 2011मध्ये शेन वॉटसनने बांगलादेशविरूद्ध नाबाद 185, 2005मध्ये बांगलादेशविरूद्ध महेंद्रसिंह धोनीने नाबाद 183 आणि 2012मध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती.