अबू धाबीत झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धोबीपछाड दिली आहे. ऑस्ट्रेलिअन संघाने ८० धावांनी पाकिस्तानवर मात केली. बुधवारी रात्री अबू धाबी येथील शेख झाएद स्टेडिअममध्ये हा सामना पार पडला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने ही मालिकाही खिशात घातली. कर्णधार आरोन फिन्च (९०) आणि ग्लेन मॅक्सवेल (७१) यांच्या दमदार भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिन्च याने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्विकारली. दरम्यान, पाकिस्तानी गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली. त्यांच्या उस्मान शिनवारीने फॉर्ममध्ये नसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या उस्मान खवजाला पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर शॉन मार्शने १४ धावा करुन जुनैद खानकडून बाद होण्यापूर्वी काही चांगले फटके मारले. मात्र, त्यानंतर कर्णधार फिन्च आणि पीटर हॅण्डस्कोम्बने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पहिल्या दहा षटकांपर्यंत दोघांनीही स्थिर खेळ केला. यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती ४८ धावांवर २ बाद अशी होती.

पावर प्ले संपल्यानंतर मात्र, फिन्च आणि पीटरने सकारात्मक खेळ केली. यावेळी कर्णधार फिन्चने आपल्या फॉर्ममध्ये सातत्य राखले आणि ८२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या विकेटसाठी फिन्च आणि हॅण्डस्कोम्बने ८४ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने यांची भागीदारी तोडली आणि हॅण्डस्कोम्ब ४३ चेंडूत ४७ धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मार्कस स्टॉइनिसला इमाद वसीमने केवळ १० धावांमध्ये बाद केले. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने मात्र पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पाचव्या विकेटसाठी फिन्च आणि मॅक्सवेल यांनी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शतकापासून केवळ दहा धावा दूर असताना पाकिस्तानच्या यासीर शाहने फिन्चला (९०) बाद केले. त्यानंतर मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. दरम्यान, मॅक्सवेलने ४२ धावांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ७१ धावा करुन बाद झाला. तर कॅरी हा २१ चेंडूत २५ धावा करीत नाबाद राहिला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ बळींच्या बदल्यात २६६ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान, विजयासाठी २६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांचे ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीने कंबरडे मोडले. पाकिस्तानचे शाह मसूद, हॅरिस सोहेल आणि मोहम्मद रिझवान हे तीन फलंदाज केवळ १६ धावांमध्येच गारद झाले. पहिल्या १० षटकांनंतर पाकिस्तानची अवस्था ३ बाद २१ धावा अशी होती. पावर प्ले संपल्यानंतर उमाम-उल-हकने शोएब मलिकच्या साथीने काही आकर्षक फटके मारले. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी ५९ धावांची भागिदारी केली. त्यानंतर हकला ग्लेन मॅक्सवेलने ४६ धावांवर बाद केले. उमर अकमलने काही चांगले फटके मारले आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तोही लवकरच बाद झाला, इमाद वसीमने ४३ धावा केल्या मात्र त्याला दुसऱ्या फलंदाजांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ४४.४ षटकांमध्ये १८६ धावांतच गुंडाळले आणि सामन्यासह मालिकाही खिशात घातली.

यापूर्वी शारजामध्ये झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिन्चच्या फलंदाजीने कमाल केली होती. फिन्चने या दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावले होते. मात्र, तिसऱ्या समान्यात तो शतक ठोकण्यात अपयशी ठरला. त्यामुळे तो सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शतक झळकावण्याचा विक्रमापासून दूर राहिला.