PAK vs AUS : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा हा दुखापतीमुळे जायबंदी झाला असून तो मालिकेत पुन्हा खेळू शकेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परंतु त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे नजीकच्या काळात होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याच्या सहभागावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान त्याला गुडघ्याच्या दुखापतीने जायबंदी केले. पहिल्या सामन्यात ख्वाजाने उल्लेखनीय कामगिरी करत १४१ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला सामना वाचवणे शक्य झाले होते. मात्र सध्या त्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची असून त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता ६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या सहभागावर प्रशचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान, याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद हा देखील दुखापतग्रस्त झाला आहे.

फलंदाजी करताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. त्यामुळे तो जायबंदी झाला. सध्या त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली असून वैद्यकीय तपासण्यांनंतर त्याच्या दुखापतीबाबत अधिक माहिती कळू शकणार आहे.