विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने पाकिस्तानात अनेकांना आनंद झाला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आणि प्रवक्ते आसिफ गफूरही मागे नाहीत. भारताच्या पराभवानंतर गफूर यांनी न्यूझीलंड संघाला शुभेच्छा देणारे एक टि्वट केले आहे. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे त्यांनी भारताला डिवचले आहे.

शानदार विजयासह आयसीसी वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठल्याबद्दल टीम न्यूझीलंडचे अभिनंदन. टीमने खिलाडूवृत्ती दाखवली व एक महान देश नैतिक मुल्यांसह खेळला असे गफूर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. महान देश, नैतिक मूल्य या शब्दांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताला डिवचले.

पाकिस्तान धावांच्या सरासरीमध्ये मागे पडल्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहोचू शकला नाही. इंग्लंड भारत आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाला असता तर पाकिस्तानी संघ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत पोहोचला असता. पण इंग्लंडने दोघांनाही पराभूत केले. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने नंतरचे सर्व सामने जिंकले पण तरीही त्यांना उपांत्यफेरीत पोहोचता आले नाही. इंग्लंडने भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानातून अनेकांनी भारताच्या खेळावर टीका केली होती.