ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला. या मालिकेत दमदार कामगिरी करणारा डेव्हिड मलाने याने चार स्थानांची झेप घेत थेट अव्वलस्थान पटकावले. त्याच्या या बढतीमुळे पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानावरून घसरून दुसऱ्या स्थानी पोहोचला. डेव्हिड मलानने ऑस्ट्रेलियालविरूद्धच्या टी२० मालिकेत दमदार कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याला बढती मिळाली आणि बाबरची क्रमवारीत घसरण झाली. बाबर जवळपास वर्षभर अव्वलस्थानी होता, पण अखेर त्याला अव्वलस्थान गमवावे लागले.

ऑस्ट्रेलियाआधी पाकिस्ताननेदेखील इंग्लंडमध्ये तीन टी२० सामन्यांची मालिका खेळली होती. त्यात १ सामना रद्द झाला होता, तर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर आता बाबर आझम व्हायटॅलीटी ब्लास्ट स्पर्धेत सोमरसेटकडून खेळतो आहे. ग्लुस्टरशायर क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या पेन या गोलंदाजाच्या १० चेंडूत बाबरने केवळ ६ धावा केल्या. त्यामुळे ग्लुस्टरशायरने त्याला चांगलेच ट्रोल केलं. केवळ क्रमवारीत अव्वल असण्याला काही महत्त्व नसतं, अशा कॅप्शनसह एका व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये १० चेंडूत त्याने अनक्रमे १,०,०,१,०,०,०,०,४ अशा धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे त्याला ग्लुस्टरशायरने ट्रोल केलं. या व्हिडीओमध्ये बाबर खरंच फटके खेळताना खूप गोंधळलेला दिसला. त्याने मारलेला एक चौकारदेखील सरळ रेषेत मारलेला फटका नव्हता. त्यामुळे त्याला ट्रोल करण्याची आयती संधीच इंग्लिश क्रिकेट क्लबला मिळाली.