‘सिटी ऑफ जॉय’ असे बिरुद मिरविणाऱ्या कोलकातानगरीतील ईडन गार्डन्सवर गुरुवारी स्मशानशांतता पसरली होती. ईडन गार्डन्सवरील पाकिस्तानच्या विजयी परंपरेचा इतिहास बदलण्याची ताकद महेंद्रसिंग धोनीच्या पोलादी मनगटात नव्हती. त्यामुळे मालिकेत परतण्याचे भारताचे स्वप्न हुबळी नदीमध्ये वाहून गेले. ईडनवरील रौप्यमहोत्सवी ऐतिहासिक सामन्यावर ८५ धावांनी वर्चस्व मिळवून पाकिस्तानने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. डिसेंबरमध्ये इंग्लिश संघाने २८ वर्षांनंतर भारतीय भूमीवर भारतावर कसोटी मालिकेत विजय मिळविण्याचा पराक्रम दाखवला होता. त्या कटू स्मृती ताज्या असतानाच आता आणखी एक धक्का भारतीय संघाला बसला आहे.
२००५मध्ये पाकिस्तान संघाने इन्झमाम उल हकच्या नेतृत्वाखाली भारतावर स्वारी केली होती. ती एकदिवसीय मालिका पाकिस्तानने ४-२ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर प्रथमच पाकिस्तानने मिसबाह उल हकच्या नेतृत्वाखाली भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. त्यामुळे पाकिस्तानी संघाने ईडनवर जल्लोषात विजय साजरा केला.
चेन्नईच्या चेपॉकवर झळकावलेल्या शतकाचाच पुनप्र्रत्यय (‘अ‍ॅक्शन रिप्ले’) नासिर जमशेदने गुरुवारी ईडन गार्डन्सवर घडविला. सलग दुसऱ्या शतकासह जमशेदने मोहम्मद हाफीझसोबत १४१ धावांची दमदार सलामी दिली. पण त्यानंतर इशांत शर्मा (३४ धावांत ३ बळी) आणि रवींद्र जडेजा (४१ धावांत ३ बळी) या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या मधल्या आणि तळाच्या फळीला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे प्रारंभ दिमाखात करणाऱ्या पाकिस्तानचा डाव २५० धावांत कोसळला. त्यांचे उर्वरित नऊ फलंदाज फक्त १०९ धावाच करू शकले.
वीरेंद्र सेहवाग (३१) आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी ४२ धावांची सलामी देत भारत हा सामना जिंकू शकतो, अशा आशा प्रकट केल्या. पण त्यानंतर भारतीय फलंदाजांनी ‘फिर वहीं कहानी..’ चा नारा जपत फक्त हजेरी लावणेच पसंत केले. त्यामुळे ४ बाद ७० अशा वाईट अवस्थेनंतर फक्त धोनी आणि सुरेश रैना जोडीने २५ धावांची छोटी भागीदारी करीत सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर पुन्हा भारताच्या डावाला खिंडार पडले. फिरकी गोलंदाज सईद अजमलने ४०व्या षटकात रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि अशोक दिंडाला तंबूची वाट दाखवत भारताला नामशेष केले. तोवर ६६ हजार प्रेक्षकक्षमतेचे ईडन गार्डन्स अध्रे रिकामे झाले होते. कप्तान महेंद्रसिंग धोनीने जिगर दाखवत नाबाद ५४ धावांची खेळी साकारली. त्याने इशांत शर्माच्या साथीने अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी रचली. पण ती भारताला विजयाच्या वाटेवर नेण्यास तुटपुंजी होती.
धावफलक
पाकिस्तान : नासिर जमशेद यष्टिचीत धोनी गो. जडेजा १०६, मोहम्मद हाफीझ त्रिफळा गो. जडेजा ७६, अझहर अली धावचीत २, युनूस खान पायचीत गो. रैना १०, मिसबाह उल हक पायचीत गो. अश्विन २, शोएब मलिक झे. युवराज गो. शर्मा २४, कमरान अकमल झे. सेहवाग गो. जडेजा ०, उमर गुल त्रिफळा गो. शर्मा १७, सईद अजमल झे. सेहवाग गो. कुमार ६, जुनैद खान नाबाद ०, मोहम्मद इरफान त्रिफळा गो. शर्मा ०, अवांतर ७, एकूण ४८.३ षटकांत सर्व बाद २५०.
बाद क्रम : १-१४१, २-१४५, ३-१७७, ४-१८२, ५-२१०, ६-२१०, ७-२३६, ८-२४९, ९-२५०, १०-२५०.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-०-६१-१, अशोक दिंडा ७-०-४२-०, इशांत शर्मा ९.३-०-३४-३, आर. अश्विन १०-०-४९-१, सुरेश रैना २-०-१३-१, रवींद्र जडेजा १०-१-४१-३, युवराज सिंग १-०-१०-०.
भारत : गौतम गंभीर त्रि. गो. जुनैद खान ११, वीरेंद्र सेहवाग पायचीत गो. गुल ३१, विराट कोहली यष्टिचीत कामरान गो. जुनैद ६, युवराज सिंग झे. कामरान गो. गुल ९, सुरेश रैना यष्टिचीत कामरान गो. हाफीझ १८, महेंद्रसिंग धोनी नाबाद ५४, रविचंद्रन अश्विन यष्टिचीत कामरान गो. मलिक ३, रवींद्र जडेजा झे. जुनैद गो. अजमल १३, भुवनेश्वर कुमार पायचीत गो. अजमल ०, अशोक दिंडा पायचीत गो. अजमल ०, इशांत शर्मा त्रि. गो. जुनैद २, अवांतर १८, एकूण ४८ षटकांत सर्व बाद १६५.
बाद क्रम : १-४२, २-५५, ३-५९, ४-७०, ५-९५, ६-१०३, ७-१३१, ८-१३१, ९-१३२, १०-१६५.
गोलंदाजी : मोहम्मद इरफान १०-०-४६-०, जुनैद खान ९-१-३९-३, उमर गुल ७-०-२४-२, मोहम्मद हाफीझ १०-०-२९-१, सईद अजमल १०-१-२०-३, शोएब मलिक २-१-३-१.
सामनावीर : नासिर जमशेद.

भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत अश्रफ आशावादी
‘‘मी भारत-पाकिस्तानच्या दोन्ही सीमांच्या पलीकडे आनंदी वातावरण पाहू इच्छितो. दोन्ही देशांतील संबंध कायम चांगले राहावेत आणि दोन्ही देशांत दर्जेदार क्रिकेट खेळले जावे, अशी माझी इच्छा आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तान भारत दौऱ्यावर आला. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत बोलणी सुरू आहेत. लवकरच या प्रयत्नांना यश येवो,’’ अशी अपेक्षा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी व्यक्त केली. बांगलादेश क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्यास नकार दिल्याप्रकरणी अश्रफ म्हणाले की, ‘‘२००९मध्ये श्रीलंकेच्या संघावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचे भय सर्वच क्रिकेट संघांवर अद्याप आहे. त्यामुळे बांगलादेशने या दौऱ्यास नकार दिला असावा. पण सध्या पाकिस्तानमधील वातावरण अत्यंत सुरक्षित आहे. आयसीसीसुद्धा पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत आहे. नुकताच झालेला एक प्रदर्शनीय सामना आणि परदेशी संघांचे पाकिस्तान दौरे पाहता लवकरच आमच्या देशात क्रिकेट परतेल अशी आशा आहे.’’
 
सचिन क्रिकेटचा सच्चा राजदूत – आलम
‘‘सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा सच्चा राजदूत आहे. सचिन जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्याचा खेळ पाहून मी प्रभावित झालो होतो. त्याच्या खेळातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व उलगडत होते,’’ असे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इन्तिखाब आलम यांनी सांगितले. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सत्कार कार्यक्रमासाठी आलेल्या आलम यांच्या अनेक आठवणी या वेळी दाटून आल्या. ‘‘१९६१मध्ये जेव्हा मी ईडन गार्डन्सवर खेळलो होतो, तेव्हा मी तीन बळी घेतले होते. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी असे भारताचे काही क्रिकेटपटू मला भेटले. त्यांच्यासोबत गप्पा मारताना त्या काळातल्या अनेक स्मृती ताज्या झाल्या,’’ असे आलम यांनी सांगितले. ‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ आणि बीसीसीआयच्या प्रयत्नांमुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील ही मालिका रंगतदार अशीच होत आहे’’, असे ते पुढे म्हणाले.

ईडन गार्डन्स हाऊसफुल्ल!
भारत-पाकिस्तान सामन्याला अपेक्षेप्रमाणेच कोलकात्याच्या क्रिकेटरसिकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. ६६ हजार प्रेक्षक क्षमतेच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरील या सामन्याच्या तिकिटांना मोठी मागणी होती. परंतु कोलकाता क्रिकेट मंडळाने फक्त ३५०० तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवली होती, तर बाकीची सर्व तिकिटे ‘कॅब’ची मान्यता असलेल्या क्लबच्या प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे कोलकातावासी ‘कॅब’वर नाराज होते. पण गुरुवारी सकाळपासून तिकीट मिळेल, या अपक्षेने अनेक क्रिकेटरसिक प्रवेशद्वारापाशी ठाण मांडून होते. या सामन्यासाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला होता. त्यामुळे क्रिकेटरसिकांना अनेक पोलिसी तपासण्यांच्या आव्हानातून एक किलोमीटर अंतर पायपीट करीत स्टेडियमपर्यंत पोहोचता आले. सचिनचा चाहता सुधीर गौतम, भारतीय संघाचा ‘बॉल बॉय’ धरमवीर यांच्याप्रमाणे अनेक चाहते लक्षवेधक पोशाख, केशरचना आदी रूपात स्टेडियममध्ये आले होते.
 
नव्या नियमाचा मुंबईला फटका
‘‘नव्या नियमांच्या आव्हानामुळे कामचलाऊ गोलंदाजांसहित दहा षटकांचा कोटा पूर्ण करणे कठीण जात आहे. भारताला दर्जेदार अष्टपैलू खेळाडूची नितांत आवश्यकता आहे,’’ असे संकेत कप्तान महेंद्रसिंग धोनीने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले होते. त्यानंतर रोहित शर्माला विश्रांती देऊन धोनीने अष्टपैलू जडेजाला संघात स्थान देणे पसंत केले. धोनीच्या या निर्णयामुळे एकाही मुंबईकर खेळाडूशिवाय भारतीय संघ पाकिस्तानशी कोलकात्याची लढाई लढला. चेन्नईत भारताचा निम्मा संघ २९ धावांत कोसळला होता. या पाश्र्वभूमीवर मुंबईचा फॉर्मात असलेल्या फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्याची गरज होती. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रहाणेला संघात स्थान देण्याचे सुचविले होते. पण नवे नियम, पाचव्या गोलंदाजाची उणीव, फलंदाजीचा फॉर्म या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून धोनीने पाकिस्तानशी पाच अष्टपैलू खेळाडूंसहित खेळण्याचे निश्चित केले. सचिनने या मालिकेपूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे आणि वेगवान गोलंदाज झहीर खान संघात स्थान मिळविण्यासाठी झगडत आहे, तर या सामन्यात रोहित आणि अजिंक्यला विश्रांती दिल्यामुळे एकाही मुंबईकर खेळाडूशिवाय भारतीय संघ खेळला. जडेजाने प्रभावी गोलंदाजी करीत कप्तानाचा अष्टपैलूबाबतचा विश्वास सार्थही ठरवला.
    – प्रशांत केणी