आयर्लंडचा पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून पाच गडी राखून पराभव झाला. या सामन्यात केव्हिन ओ’ब्रायनने झुंझार वृत्ती दाखवत शतकी खेळी केली. मात्र, त्याला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी केवळ १६० धावांचे माफक आव्हान मिळाले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात पाच गडी राखून पार केले.

या डावात पाकिस्तानकडून इमाम हक (नाबाद ७४) आणि बाबर आझम (५९) यांनी शानदार अर्धशतके झळकावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या १६० धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या गोलंदाजांनीही पाकिस्तानला चांगलेच झुंजवले. मुरतघने २ तर रँकिन आणि थॉम्पसनने प्रत्येकी १-१ बळी टिपला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून आयर्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने ९ बाद ३१० या धावसंख्येवर डाव घोषित केला. फहीम अश्रफने सर्वाधिक ८३ धावा केल्या. तर मुरतघने ४ बळी टिपले.

आयर्लंडचा पहिला डाव मात्र निराशाजनक ठरला. त्यांचा पाकिस्तानने १३० धावांत खुर्दा उडवला. केव्हिन ओ’ब्रायनने ४० धावा केल्या. तर मोहम्मद अब्बासने ४ गडी बाद केले. त्यानंतर पाकिस्तानने आयर्लंडला फॉलो-ऑन दिला. फॉलो-ऑन डावात केव्हिन ओ’ब्रायनने आपली चूक सुधारत सावध खेळ केला आणि कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. त्याने ११८ धावा केल्या. त्याने २१७ चेंडूंत १२ चौकारांसह ही खेळी उभारली. त्याच्या खेळीमुळे आयर्लंडवर ओढवलेली डावाच्या पराभवाची नामुष्की टळली.

संक्षिप्त धावफलक –

पाकिस्तान – पहिला डाव ३१० / ९ (डाव घोषित)

फहीम अश्रफ – ८३ (११५)
असद शफिक – ६२ (१२१)

टीम मुरतघ – ४५ / ४
स्टुअर्ट थॉम्पसन – ६२ / ३

आयर्लंड – पहिला डाव १३० / १०

केव्हिन ओ’ब्रायन – ४० (६८)
गॅरी विल्सन – ३३ (७४)

मोहम्मद अब्बास – ४४ / ४
शादाब खान – ३१ / ३

आयर्लंड – दुसरा डाव ३३९ / १०

केव्हिन ओ’ब्रायन – ११८ (२१७)
स्टुअर्ट थॉम्पसन – ५३ (११६)

मोहम्मद अब्बास – ६६ / ५
मोहम्मद आमीर – ६३ / ३

पाकिस्तान – दुसरा डाव १६० / ५

इमाम उल हक – ७४* (१२१)
बाबर आझम – ५९ (११४)

टीम मुरतघ – ५५ / २
स्टुअर्ट थॉम्पसन – ३१ / १