आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) ज्युनियर हॉकी वर्ल्डकपमधून पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पाकिस्तानने त्यास भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने शेवटच्या तारखेपर्यंत आपल्या खेळाडूंच्या आगमनाच्या कार्यक्रमाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान हॉकी महासंघाने यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघावर टीका केली आहे. त्यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप पीएचएफने केला आहे. तसेच यासाठी सचिव शाहबाज अहमद यांनी भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र द ‘डॉन’ने शाहबाज यांच्या हवाल्याने पाकिस्तानने कोणत्याही कार्यक्रमात विलंब केला नाही, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानी खेळाडूंना अंतिम तारखेच्या आधी व्हिसा न देणे ही भारताची चुकी आहे, असे त्यात म्हटले आहे.

आमच्या सरकारने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना वेळेत ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. पाकिस्तान ज्युनियर हॉकी स्पर्धेत सहभागी होणार नाही, ही आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. आम्ही आमच्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीरही घेतले होते, मग आम्ही त्यांच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यास विलंब कसे करणार, असा प्रश्नही शाहबाज यांनी उपस्थित केला आहे. लखनऊ येथे मेजर ध्यानचंद मैदानात आठ डिसेंबरपासून ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर झाल्याने त्याऐवजी हॉकी महासंघाने मलेशियाचा समावेश केलेला आहे. हॉकी महासंघाने हा निर्णय पाकिस्तान हॉकी महासंघाशी चर्चा करूनच घेतलेला आहे. निश्चित वेळेनंतर खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज देण्यात आले. ठरलेल्या कार्यक्रमाबाबत अनेकदा स्मरण करून दिल्यानंतरही पीएचएफकडून कोणतेही उत्तर आले नाही, असे हॉकी महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.