पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इंझमाम म्हणाला, ”पंत असाच खेळत राहिला तर, तो महेंद्रसिंह धोनी आणि अ‍ॅडम गिलख्रिस्टला मागे टाकेल.” क्रिकेटच्या मैदानावर भन्नाट फटके खेळणाऱ्या पंतची इंझमामला भूरळ पडली आहे. पंत मैदानावर नेत्रदीपक फटके खेळतो, असे त्याने सांगितले.

इंझमामने एका यूट्यूब चॅनलवर सांगितले की, खालच्या फळीतील फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 40 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली. त्याच्यामुळे भारताची धावगती वाढली. मी गेल्या 7 महिन्यांपासून त्याला पाहत आहे. तो विविध क्रमांकावर प्रभावीपणे फलंदाजी करतो आणि ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.

इंझमामचे पूर्ण विधान

इंझमाम म्हणाला, ”पंतने ज्या पद्धतीने स्वत: ला व्यक्त केले आहे, ते खरच भन्नाट आहे. गेल्या 30-35 वर्षांत महेंद्रसिंह धोनी आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट या दोन यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये मी असे फटके खेळण्याचे कसब पाहिले आहे. या दोघांमध्येही सामन्याचे चित्र पालटण्याची शक्ती होती. पंतही अशीच कामगिरी करत आहे. जर तो असेच खेळत राहिला, तर तो या दोघांनाही मागे टाकेल.”

केएल राहुलच्या फलंदाजीबद्दल इंझमाम म्हणाला, त्याने संथ फलंदाजी केली नाही. त्याची खेळी खूप चांगली होती. पंतच्या खेळीमुळे संघाची धावगती वाढली. त्यामुळे इंग्लंडसमोर भारताला मोठे आव्हान उभे करता आले.

तिसऱ्या वनडेत पंतची अर्धशतकी खेळी

पुण्यात भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केली. विराट कोहली आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर पंत आणि हार्दिक पंड्याने संघाला सावरले. या दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. पंतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. त्याला सॅम करनने बाद केले.