विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्यामुळे साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर श्रीलंकेसोबत तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानात खेळताना यजमानांनी २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली, पण टी २० मालिकेत मात्र पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा सतत अपमान केला जात आहे. तशातच एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याचाही पत्रकाराने पाणउतारा केला.

पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष मिस्बाह-उल-हक यांनी सर्फराझची कर्णधार म्हणून फेरनिवड केली. त्यानंतर पाकिस्तानवर टी २० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. कर्णधार आणि अनुभवी फलंदाज या नात्याने सर्फराझकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. या मालिकेनंतर आता सर्फराझ Pakistan National T20 Cup स्पर्धेत सिंध संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्या संदर्भातील एका पत्रकार परिषदे दरम्यान सर्फराझचा एका प्रश्नामुळे चांगलाच पाणउतारा झाला.

पत्रकार परिषदेत सर्फराझला असा एक प्रश्न विचारण्यात आला की सर्फराझही ओशाळला. “सर्फराझ, क्रिकेट चाहत्यांना तू तुझ्या कामगिरीने खूपच निराश केले आहेस. त्यामुळे फैजलाबादमध्ये होणाऱ्या Pakistan National T20 Cup स्पर्धेत पैसे देऊन आणि तिकिटे काढून तुझा खेळ पहायला कोण येणार?”, असा सवाल करत पत्रकाराने सर्फराझचा पाणउतारा केला.

दरम्यान, अशा प्रकारच्या सततच्या अपमानामुळेच त्याने सिंध संघाचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला आहे, अशी चर्चा देखील रंगली आहे.