20 November 2017

News Flash

पाकिस्तानवरही ऑलिम्पिक बंदीची टांगती तलवार

भारताप्रमाणेच पाकिस्तानवरही ऑलिम्पिक बंदी येण्याची दाट शक्यता आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे पाकिस्तानवर ऑलिम्पिक बंदी आणण्याविषयी

वृत्तसंस्था, लुसान | Updated: February 13, 2013 5:55 AM

भारताप्रमाणेच पाकिस्तानवरही ऑलिम्पिक बंदी येण्याची दाट शक्यता आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे पाकिस्तानवर ऑलिम्पिक बंदी आणण्याविषयी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) गांभीर्याने विचार करत आहे. ‘‘सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही पाकिस्तानवर बंदी आणण्याचा विचार करत आहोत,’’ असे आयओसीचे प्रवक्ते मार्क अ‍ॅडम्स यांनी सांगितले.
‘‘पाकिस्तान क्रीडा संघटना स्वतंत्र असण्याविषयीच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशन आणि त्यांच्या सरकारच्या प्रतिनिधींना या आठवडय़ात आयओसीच्या मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. मात्र पाकिस्तान सरकारने या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केल्याचे समजते,’’ असे अ‍ॅडम्स यांनी सांगितले. गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांसह पाकिस्तान सरकारमधील पदाधिकारी असोसिएशनच्या कामात ढवळाढवळ करत आहेत, असा दावा असोसिएशनने केला आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सरकारी हस्तक्षेप केल्याबद्दल आयओसीने भारतावर ऑलिम्पिक बंदी आणली आहे. ऑलिम्पिक बंदीनंतर, कोणत्याही राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनला आयओसीकडून मिळणारा निधी लगेचच बंद करण्यात येतो. राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनमधील कोणताही पदाधिकारी ऑलिम्पिक समितीच्या बैठकीला हजर राहू शकत नाही. त्याचबरोबर ऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक समितीशी संलग्न असलेल्या कोणत्याही स्पर्धामध्ये खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करता येत नाही. त्यांना ऑलिम्पिकच्या झेंडय़ाखाली या स्पर्धामध्ये उतरावे लागते.

First Published on February 13, 2013 5:55 am

Web Title: pakistan close to an olympic ban says ioc