विश्वचषक स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात भारताने जेव्हा पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटली होती. हा खुलासा केला आहे पाकिस्तानी क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला सामना म्हणजे एखाद्या युद्धासारखाच असतो. हा सामना भारताने जिंकला, मात्र हा सामना भारताने जिंकल्यावर मला जीव द्यावासा वाटत होता असे मिकी आर्थर यांनी म्हटले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओही समोर आला आहे.

रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने त्यांचा पराभव केला. ही बाब माझ्यासाठी समाधानकारक आहे तरीही जेव्हा आम्ही भारतासोबत सामना हरलो तेव्हा मला वाटले होती की आत्महत्या कारवी असेही आर्थर यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब बोलून दाखवली. पाकिस्तानच्या संघाचा जेव्हा टीम इंडियाने पराभव केला तेव्हा पाकिस्तानच्या संघावरचे दडपण वाढले होते. माझ्या मनात त्यावेळी आत्महत्येचा विचार आला होता असे आर्थर यांनी सांगितले. मात्र त्यावेळी त्यांनी आत्महत्या केली नाही ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.

१६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात विश्वचषक स्पर्धेतील क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ३३६ धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेत एकदा तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला की पुन्हा तुमचा पराभव होण्याची शक्यता जास्त असते. कारण आधी झालेल्या पराभवामुळे संघावर दडपण असते. माझ्यावरही दडपण आले होते, भारतासोबत आम्ही सामना हरलो तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटली होती असं आर्थर यांनी म्हटलं आहे.