आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तान आज बुधवारी बांगलादेश संघाविरोधात दोन हात करणार आहे. सुपर फोरमधील या अंतिम सामन्याला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विजयी संघ शुक्रवारी भारताविरोधात अंतिम सामना खेळणार आहे. सामन्याच्या पुर्वसंध्येला पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पाकिस्तान संघ बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि भारताचा पराभव आशिया चषकावर नाव कोरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

भारताविरुद्ध सुपर फोर सामन्यात ९ गड्यांनी लाजिरवाणारा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी संघाची वाटचाल खडतर असल्याचे म्हटले आहे. ‘निर्णायक लढतींत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरते,’ असे प्रशिक्षक आर्थर यांनी यावेळी म्हटले.

पुढे बोलताना मिकी अर्थर म्हणाले की, ‘सुपर फोर लढतीत पाकिस्तानचा संघ बांगलादेशवर एकहाती विजय मिळवून आशिया चषकावर नाव कोरून भारताकडून मिळालेल्या पराभवचा बदला घेईल. भारताबरोबर झालेल्या सामन्यात आम्ही बळी घेण्यात अपयशी पडलो. पण गोलंदाजांनी लवकर गडी बाद केले असते तर सामन्याचा निकाल वेगळा पहायला मिळाला असता. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला हे मान्य आहे. पण पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात आपली कामगिरी चांगली करेल.’

सर्वच क्षेत्रात भारतीय संघाची कामगिरी सरस – सर्फराज
फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिनही आघाड्यांवर भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं असून सोमवारी पाकिस्तानचा कप्तान सर्फराज अहमद यानं भारतीय संघ पाकपेक्षा वरचढ असल्याचं मान्य केलं आहे. “त्यांची कामगिरी चांगली आहे, आम्ही त्या दर्जापाशी पोचू शकलेलो नाही. परंतु अंतिम सामन्यापर्यंत आम्हीही त्याच दर्जाची कामगिरी करू. पुढील सामना आमच्यासाठी ‘जिंका अथवा मरा’ असा असून आम्ही या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू,” असे सर्फराज म्हणाला. “जर आम्ही झेल सोडत राहिलो तर सामने जिंकणं कठीण आहे. आम्ही खरंतर क्षेत्ररक्षणाचा चांगलाच सराव केला आहे. परंतु काय चुकतंय तेच कळत नाही,” अशा शब्दांमध्ये सर्फराजनं खंत व्यक्त केली आहे.

भारताला अंतिम फेरीत आव्हान कोणाचे?

आज सुपर फोरमधील अंतिम सामना आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ शुक्रवारी भारताविरोधात लढेल. अनुभवी फलंदाज शोएब मलिकवर पाकिस्तानची फलंदाजी सर्वाधिक अवलंबून आहे. सलामीवीर फखर झमान आणि इमाम-उल-हक यांनी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना वगळता एकाही लढतीत चांगली फलंदाजी केलेली नाही. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा हरवलेला फॉर्म पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार सर्फराज अहमद त्याला वगळण्याचा धाडसी निर्णय घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.