पाकिस्तानचे माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे मिकी आर्थर यांना प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर आज पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिस्बाह-उल-हक यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या निवड समिती अध्यधपदीही मिस्बाह-उल-हक यांचीच निवड करण्यात आली आहे. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इन्तिखाब आलम व बाजीद खान, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे सदस्य असद अली खान, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान आणि मंडळाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक झाकीर खान या ५ सदस्यीय समितीने मिस्बाह-उल-हक यांची एकमताने निवड केली. मिस्बाहसह डीन जोन्स, मोहसीन खान आणि कर्टनी वॉल्श हे तीन दिग्गज क्रिकेटपटूदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. पण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मिस्बाह यांच्यावर विश्वास दाखवला. तसेच मिस्बाह यांच्या शिफारशीनुसार माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचाही कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.