अति तीव्र क्षमतेच्या भूकंपानंतरही पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि न्यूझीलंड क्रिकेट यांनी यासंदर्भात माहिती दिली. रविवारी न्यूझीलंडमध्ये ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. अति तीव्र क्षमतेच्या भूकंपामुळे न्यूझीलंडच्या काही शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र न्यूझीलंड दौऱ्यावर असणारे पाकिस्तानचे पुरुष आणि महिला संघ सुरक्षित आहेत आणि दौरा वेळापत्रकानुसार होणार असल्याचे दोन्ही बोर्डानी स्पष्ट केले.

पाकिस्तानचा संघ सराव सामन्यासाठी नेल्सन येथे आहे. सराव सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ ख्राइस्टचर्चला रवाना होणार आहे. पहिली कसोटी १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू या शहरांपासून २०० किलोमीटर अंतरावर होता, मात्र पाकिस्तानचे संघ असलेल्या शहरांमध्ये जोरदार धक्के जाणवले, असे पाकिस्तानच्या खेळाडूंनी सांगितले.

पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. हा संघ ख्राइस्टचर्च शहरातील हॉटेलमध्ये १३व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. भूकंपामुळे खेळाडू घाबरले होते. मात्र संपूर्ण संघ सुरक्षित असल्याचे व्यवस्थापक बासित अली यांनी सांगितले. न्यूझीलंडच्या दक्षिण किनाऱ्याच्या पूर्व बाजूला सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे. नेल्सन शहर याच परिसरात आहे. पाकिस्तान महिला संघाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केले.

पुरुष संघ ख्राइस्टचर्च शहरात पहिली कसोटी खेळणार आहे. भूकंपामुळे मैदान तसेच खेळपट्टीचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यात येत आहे. कसोटीच्या आयोजनासाठी स्टेडियम सज्ज असेल का याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.