यंदा ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. हा टी-20 वर्ल्ड कप भारतात नऊ ठिकाणी होईल आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल, अशी माहितीही देण्यात आली आहे. काल शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू, हैदराबाद, धर्मशाला आणि लखनऊ या ठिकाणी आगामी वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. परिषदेच्या एका सदस्याने सांगितले, की पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिसाचा प्रश्न सुटला आहे. मात्र, चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा निर्णय वेळेवर होईल. महत्त्वाचे म्हणजे भारत आणि पाकिस्तान जवळजवळ दशकभर आपापसात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेले नाहीत.

महिला संघाचे वेळापत्रक

त्याशिवाय तीन महिला संघाची टी-20 चॅलेंज स्पर्धाही खेळवण्यात येईल आणि त्यानंतर लवकरच हा संघ इंग्लंडला रवाना होईल, असेही समितीने ठरविले. महिला क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये संपूर्ण मालिका खेळतील. तिथून परतल्यावर विंडीज किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिकेसाठी महिला संघ तयार असेल. या मालिकेनंतर संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाईल आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये आणखी एक मालिका खेळेल. न्यूझीलंड विरुद्ध द्विपक्षीय मालिका किंवा तिरंगी मालिका वनडे वर्ल्डकपच्या आधी होईल, असेही परिषदेत सांगण्यात आले आहे.

2016मधील टी-20 वर्ल्डकप भारतात खेळला गेला, त्यादरम्यान बीसीसीआयने 7 ठिकाणी स्पर्धेचे सामने खेळवले होते. नागपूर आणि मोहाली येथेही सामने घेण्यात आले होते, परंतु यावेळी या दोन स्थानांऐवजी हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.