वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज आझम खानला संघाच्या प्रशिक्षण सत्रात डोक्याला मार लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात न्यावे लागले. आझमला दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यातून वगळण्यात आला आहे. २२ वर्षीय आझम खानने या महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आझमच्या दुखापतीबाबत माहिती दिली. यानुसार, एका न्यूरोसर्जनने आझमला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्याची शिफारस केली आहे. सोमवारी त्याच्या प्रकृतीची पुन्हा तपासणी केली जाईल. त्यानंतरच चौथ्या आणि पाचव्या टी-२० मध्ये त्याच्या खेळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. जेव्हा आझमच्या डोक्याला मार लागला, तेव्हा त्याने हेल्मेट घातले होते.

 

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्याआधी ही पाकिस्तानची शेवटची टी-२० मालिका आहे. यानंतर विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली जाईल. अशा परिस्थितीत आझम खानला विश्वचषकासाठी तिकीट मिळवणे सोपे जाणार नाही. कारण त्याला आतापर्यंत मधल्या फळीत खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. पदार्पणाच्या टी-२० मध्ये तो शेवटच्या षटकात फलंदाजीला आला आणि स्वस्तात बाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये त्याला संधी मिळाली नाही.

हेही वाचा – Tokyo 2020 : भारताच्या रणरागिणींचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, वंदनाची विक्रमी हॅट्ट्रिक!

‘वजनदार’ खेळाडू म्हणून आझमची ओळख

आझम खानला त्याच्या वजनामुळे टीकेला बळी पडावे लागते. आझमचे वजन सुमारे ११० किलो आहे आणि त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जातात. गेल्या एका वर्षात त्याने ३० किलो वजन कमी केले आहे. राष्ट्रीय संघात निवड होणे, हे आझम खानसाठी अजिबात सोपे नव्हते. आझम हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज मोईन खान यांचा मुलगा आहे. गेल्या पीएसएल मोसमापासून पाकिस्तान संघाच्या निवडकर्त्यांचे आझमकडे लक्ष होते. पहिल्याच चेंडूपासून हाणामारी करण्यासाठी आझम ओळखला जातो.

पीएसएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात आझम खानने खालच्या फळीत फलंदाजीला येऊन पाच सामन्यांत १४४च्या स्ट्राईक रेटने ९८ धावा केल्या. मागील हंगामात आझमने ९ सामन्यांत १३०च्या स्ट्राईक रेटने १५० धावा केल्या. २२ वर्षीय आझम खानच्या या कामगिरीमुळे निवडकर्ते खुष झाले होते.