News Flash

“काही लोकांना मानसिक constipation असतं”, पाकिस्तानच्या सलमान बटचा वॉनवर पलटवार

कोहली-विल्यमसनच्या तुलनेवरून बट-वॉनमध्ये जुंपली

मायकेल वॉन आणि सलमान बट

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलमान बट यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. वॉनने सलमानला ‘मॅच फिक्सर’ म्हटले होते. यावर बटने पलटवार केला आहे. वॉनचे ‘मॅच फिक्सर’संबधी विधान निराधार आहे, असे बटने सांगितले. आपल्या यू ट्यूब चॅनेलवर बट म्हणाला, ”मला एवढेच सांगायचे आहे, की वॉनने चुकीच्या संदर्भात हा विषय निवडला आणि काही अर्थहीन चर्चा केली. काही लोकांना मानसिक बद्धकोष्ठता (constipation) असते. ते काही करू शकत नाहीत.”

सलमान बटने आपल्या युट्यूब वाहिनीवरील व्हिडिओत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन यांच्याविषयी वॉनच्या तुलनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. बट म्हणाला, ”वॉनने मला जे काही सांगितले त्याविषयी कोणतेही औचित्य नव्हते. जर त्याला भूतकाळात रहायचे असेल आणि त्याबद्दल बोलू इच्छित असेल, तर तो नक्कीच तसे करू शकतो. बद्धकोष्ठता हा एक आजार आहे. गोष्टी अडकतात आणि त्या सहज बाहेर येत नाहीत. काही लोकांना मानसिक बद्धकोष्ठता असते. त्याचे मन भूतकाळात आहे. परंतु मला काही फरक पडत नाही.”

”आम्ही दोन (विराट आणि विल्यमसन) महान खेळाडूंबद्दल बोलत होतो आणि वॉनने त्याला दुसर्‍या दिशेने नेले. काय झाले यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. ते लाख बोलतात, परंतु यामुळे तथ्य बदलणार नाहीत. कोहलीची तुलना कोणाशीही करता येणार नाही. मी कोणत्याही देशाला अनुकूल नाही. वॉनच्या उत्तरावरुन मी निराश आहे. त्यात त्याचा काही अर्थ नव्हता. जर तुम्ही चिखलात दगड फेकला, तर तो तुमच्यावरही उडेल. तो माणूस कसा आहे हे त्याने आपल्या वक्तव्यातून सिद्ध केले.”

नक्की प्रकरण काय?

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीविरोधात असे विधान केले होते की, केन विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असता. मात्र, विल्यमसन कोहलीशी सामना करू शकत नाही, कारण इन्स्टाग्रामवर त्याचे १०० मिलियन फॉलोअर्स नाहीत. बटने वॉनच्या या वक्तव्याला विरोध केला. त्याने इंग्लंडच्या माजी कर्णधाराला तथ्य आणि आकडेवारीनुसार आपला मुद्दा पुढे ठेवण्याचा सल्ला दिला. त्याचा हा सल्ला वॉनला आवडला नाही आणि तो नाराज झाला. त्याने बटला मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटला बदनाम करण्याविषयी जबाबदार ठरवले.

सलमान बटवर मोहम्मद आमिर आणि मोहम्मद असिफ यांना आयसीसीने फिक्सिंगसाठी बंदी घातली होती. २०१०च्या लॉर्ड्स कसोटीदरम्यान हे खेळाडू स्पॉट फिक्सिंगसाठी दोषी आढळले होते. तिघांनाही काही काळ तुरुंगात जावे लागले. वॉनने बटला याच घटनेची आठवण करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 12:32 pm

Web Title: pakistan cricketer salman butt furious over michael vaughan statement as match fixer adn 96
Next Stories
1 राफेल नदालचा वर्ल्ड नंबर १ खेळाडूला ‘दणका’
2 टीम इंडिया सप्टेंबरमध्ये करणार ऑस्ट्रेलिया दौरा
3 “१० ते १२ वर्ष मी ‘त्या’ समस्येचा सामना करत होतो, अनेक रात्री झोपलो नाही,” सचिन तेंडुलकरचा खुलासा
Just Now!
X