पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट संघांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरजच नाही. पण, याच दोन संघांच्या खेळाडूंविषयी सांगावं तितकं कमीच. भारतीय आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना दोन्ही देशांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळते. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अशाच काही खेळाडूंपैकी एक म्हणजे शाहिद अफ्रिदी. आपला अनोखा फॉर्म आणि भारतासोबत खेळतानाचा अंदाज यासाठी ओळखला जाणारा शाहिद अफ्रिदी सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.

सेंट मॉरिट्ज आइस क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने हजर राहिलेल्या शाहिदच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यामध्ये एका भारतीय चाहतीचाही समावेश होता. तिच्या हातात तिरंगाही होता. शाहिदनेही तिचा उत्साह पाहून सेल्फी काढण्यास होकार दिला. पण, फोटो काढण्यापूर्वी त्या तरुणीच्या हातात असलेला तिरंगा तिने नीट पकडला नसल्याचं लक्षात येताच शाहिदने तिला तिरंगा व्यवस्थित पकडण्यास सांगितलं आणि त्यानंतरच तिच्यासोबत फोटो काढला.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

शाहिदचं हे वागणं आणि सेल्फी काढतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांची तो आपल्या अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. मुख्य म्हणजे आफ्रिदीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
सध्या सुरु असणाऱ्या सेंट मॉरिट्ज आइस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये शाहिद अफ्रिदीव्यतिरिक्त शोएब अख्तर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, लसिथ मलिंगा, महेला जयवर्धने या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबतच जगभरातील अनेक क्रीडारसिकांनी हजेरी लावल्याचंही पाहायला मिळालं.