क्रिकेटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात उसळता चेंडू डोक्याला लागून पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू झाला. १४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या निर्मितीदिनी क्लब सामना सुरु असताना ही घटना घडली. यात झुबेर अहमद या नवोदित खेळाडूचा मृत्यू झाला. झुबेर अहमद क्वेटा बिअर्स क्लबकडून खेळत होता. पाकिस्तानच्या निर्मितीदिनानिमित्त एका खासगी क्लबकडून क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात झुबेर हेल्मेट न घालता मैदानात उतरला होता. तो फलंदाजी करत असताना एक वेगवान चेंडू त्याच्या डोक्याला लागला. चेंडू डोक्याला लागल्यानंतर तो खाली कोसळला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत त्याच्या मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच झुबेरच्या कुटुंबाप्रती बोर्डाने सहानुभूती दर्शवली. मैदानावर खेळाडूंनी सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये क्लब क्रिकेटरचा चेंडू लागून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कराचीमधील मैदानात छातीत बॉल लागल्याने १८ वर्षीय क्रिकेटर मोहम्मद याचा मृत्यू झाला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच्या मृत्यूनंतर खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी हेल्मेटमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले. मात्र या घटनेनंतरही अनेक खेळाडू आजही हेल्मेटविना मैदानात उतरताना दिसतात.