भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या देशांमधलं द्वंद्व प्रत्येकाला माहिती आहे. कोणत्याही खेळाचं मैदान असो, भारत-पाक सामना म्हणलं की प्रत्येक चाहत्यात एक वेगळाच जोश येतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटमध्येही अशाच प्रकारे रंगतदार सामने होतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका खेळवल्या जात नसल्या तरीही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोरासमोर येतात. २०१९ विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानवर मात केली होती. या सामन्याआधी कॉफी प्यायला गेलेल्या भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी चाहत्यांनी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याचं भारताचा खेळाडू विजय शंकरने सांगितलं.

“भारत-पाक सामन्याआधी मी आणि संघातले काही खेळाडू कॉफी प्यायला बाहेर गेलो होतो. त्यावेळी काही पाकिस्तानी चाहते तिकडे आले आणि त्यांनी थेट आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. पण आम्ही त्यावेळी काही बोलू शकत नव्हतो. ती लोकं आम्हाला शिवागळ करण्यापासून आमचं रेकॉर्डींग करण्यापर्यंत सर्वकाही करत होती. पण आम्ही त्यावेळी काहीही केलं नाही, फक्त जे काही घडत आहे ते पाहत होतो.” भारत-पाकिस्तान सामन्यावेळी नेहमी असा माहोल असतो, विजय शंकर Bharat Army च्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाने पाकिस्तानवर मात केली. २०१९ स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली. परंतू उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं.