कोणत्याही संघाचा क्रिकेटपटू असतो, चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नेहमी आतूर असतात. परंतू सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरु करताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी मैदानात चाहत्यांना परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानी गोलंदाज हारीस रौफसोबत सेल्फी काढणं एका चाहत्याला चांगलंच महागात पडलं आहे. रौफसोबत सेल्फी काढल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं या चाहत्याला समजलं आहे. मोहम्मद घौरी असं या चाहत्यांच नाव आहे, ज्यावेळी हारीसला करोनाची लागण झालेली असल्याचं कळताच मोहम्मदची फेसबूकवर पोस्ट काही अशी होती…

पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यासाठी हारिस रौफची संघात निवड झाली होती. परंतू यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने केलेल्या करोना चाचणी त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे हारिस रौफला क्वारंटाइन होण्याचे आदेश दिले. क्वारंटाइन होण्याचे आदेश दिल्यानंतरही हारिस घराबाहेर कसा पडला याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रौफच्या जागेवर मोहम्मद आमिरची पाकिस्तानी संघात निवड करण्यात आली आहे.

२२ जुलै रोजी पाकिस्तानी संघासोबत रौफने इंग्लंडला रवाना होणं अपेक्षित होतं. परंतू पाक क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत केलेल्या पाचही चाचण्यांमध्ये रौफचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे हारीस रौफला संघातून वगळण्यात आलं.