आशिया चषकामध्ये आज बुधवार भारत आणि पाकिस्तान यांच्यात महासंग्राम होणार आहे. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना आहे. दोन्ही संघाने हाँगकाँग संघाचा पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. दोन्ही संघामध्ये अखेरचा सामना १८ जून २०१७ रोजी झाला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यास आतुर असेल. पण पाकिस्तान संघात असे काही खेळाडू आहेत जे सामन्याचा निकाल बदलू शकतील. जाणून घेऊयात पाकिस्तान संघातील या चार खेळाडूबद्दल….

१) फखर झमान
पाकिस्तानचा हा सलामीवीर भारतीय गोलंदाजावर भारी पडणार आहे. फखर झमानने चॅम्पियन ट्रॉफ्रीच्या अंतिम सामन्यात१०६ चेंडूत ११४ धावांची खेळी केली होती. फकर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने भारताविरोधात मोठी धावसंख्या उभारली होती. फखर झमानने जिम्बाब्वे संघाविरोधात द्विशतक झळकावले आहे. फखरने १९ वनडे सामन्यात ७२ च्या सरासरीने १०८९ धावा केल्या आहेत. यामध्ये एक द्विशतक, तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय गोलंदाजांना सामन्यावर पकड मिळवायची असल्यास फखरला लवकर बाद करावे लागेल.

२) बाबर आझम
बाबर आझम सध्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. बाबारने ४७ एकदिवसीय सामन्यातील ४५ डावांत फलंदाजी करताना दोन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक वेगवाग दोन हजार धावा काढणाऱ्यामध्ये बाबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सामन्यावर पडक मिळवण्यासाठी भारतीय संघाला बाबरला लवकर बाद करावे लागेल.

३) हसन अली
पाकिस्तान संघाचा हा मध्यमगती गोलंदाज भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. हसन अली विरोधात भारतीय संघाला रणनिती आखावी लागेल. हसन सध्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. हसन अलीने ३४ एकदिवसीय सामन्यात ७० बळी घेतले आहेत.

४) शादाब खान
पाकिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाच्या विजयात अडथळा बनू शकतो. शादाब फलंदाजीबरोबर अचूक टप्यावर गोलंदाजीही करतो. शादाबने २३ एकदिवसीय सामन्यात ३५ बळी घेतले आहेत. याशिवाय ८ सामन्यात फलंदाजी करताना तीन अर्धशतकासह २०८ धावा काढल्या आहेत.

कोहलीने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा रोहित युवा खेळाडूंची योग्य सांगड कशारीतीने घालतो, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.  भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १२९ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी भारताला ७३ सामन्यांत नमवले असून भारताने ५२ लढतीत विजय मिळवला आहे. उर्वरित चार सामने अनिर्णीत राहिले आहेत.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, खलिल अहमद.