भारताविरुद्धच्या थरारक सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाला वेध लागले आहेत ते आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे. पण यासाठी त्यांच्यापुढे आव्हान असेल ते यजमान बांगलादेशचे. फाळणीनंतर या दोन्ही देशांमध्ये वितुष्ट आल्याने मैदानातही त्यांच्यातील ईर्षां पाहायला मिळेल.
भारताविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा जिद्द दाखवून दिली. या सामन्यात अष्टपैलू चमक दाखवत मोहम्मद हफिझने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याच्याकडून संघाला नक्कीच मोठय़ा अपेक्षा असतील. त्याचबरोबर कर्णधार मिसबाह-उल-हक आणि उमर अकमल यांनीही स्पर्धेत चांगली कामगिरी गेली आहे. गोलंदाजीमध्ये सईद अजमल हा संघाचा हुकमी एक्का असून त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळत आहे.
शकिब-अल-हसनचे पुनरागमन ही बांगलादेश संघासाठी सर्वात मोठी जमेची बाजू असेल. कारण यापूर्वी त्याने बांगलादेशला बऱ्याचदा विजयाची स्वप्ने दाखवली आहेत. कर्णधार मुशफिकर रहिम चांगल्या फॉर्मात आहे. गोलंदाजीमध्ये मात्र अजून बांगलादेशला छाप पाडता आलेली नाही.