पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने भारत २०१९ वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवू शकतो या टि्वटचे समर्थन केले होते. सोशल मीडियावर केलेली चूक लक्षात आल्यानंतर त्याने लगेच माघार घेतली. मागच्या रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी दारुण पराभव केला. त्यानंतर आजतकच्या पत्रकाराने विराट कोहलीच्या टीमचे अभिनंदन करणारे टि्वट करताना भारताला वर्ल्डकप विजेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या.

महिला पत्रकाराच्या टि्वटवर हसन अलीने ‘होगी आप की दुवा पुरी कॉन्ग्रॅज्युलेशन’ असे टि्वट केले होते. हसन अलीने नंतर हे टि्वट डिलीट केले. भारताविरुद्धच्या सामन्यातील खराब प्रदर्शनाबद्दल हसन अलीला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने नऊ षटकात ८४ धावांच्या बदल्यात फक्त एक विकेट मिळवला.

स्पर्धेतील पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सुमार कामगिरीबद्दल कर्णधार सरफराझ अहमदसह संपूर्ण संघाला प्रचंड टीका सहन करावी लागत आहे. पाकिस्तानला पाच सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाविरोधातील टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे.