कराची : पाकिस्तानमधील हॉकी खेळाची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच बिकट होती मात्र करोनामुळे आता देशात या खेळाचा शेवट जवळ आला आहे, असे पाकिस्तान हॉकी महासंघाचे (पीएचएफ) सरचिटणीस आसिफ बाजवा यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमधील तीन सुवर्णपदके आणि चार विश्वचषकाचे मानकरी असा पाकिस्तान हॉकीचा सोनेरी इतिहास आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीमुळे प्रायोजकांनी पाठ फिरवली आहे. त्यातच करोनामुळे आणखी बिकट परिस्थिती झाली आहे. ‘‘करोना विषाणू संसर्गामुळे हॉकी खेळावर बिकट परिणाम झाला आहे. पीएचएफ याआधीच आर्थिक संकटात आहे. त्यात करोनामुळे आणखी भर पडली आहे. खेळाडूंसाठी काहीतरी मदतीचा हातभार लावता येईल अशीदेखील पीएचएफची आर्थिक स्थिती नाही. करोनातून बाहेर पडल्यावर जेव्हा सर्व सुरळीत सुरू होईल तेव्हादेखील पीएचएफला मोठय़ा आर्थिक मदतीची गरज आहे. अन्यथा खेळाडूंना परदेशात आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी पाठवणे अवघड आहे,’’ याकडे बाजवा यांनी लक्ष वेधले.

‘‘जे खेळाडू परदेशात व्यावसायिक हॉकी लीगमध्ये खेळत आहेत ते चांगल्यापैकी पैसे मिळवतात मात्र अन्य खेळाडूंची परिस्थिती बिकट आहे. हॉकीचा पाकिस्तानातील एकेकाळचा सोनेरी इतिहास पाहता सरकारने आणि उद्योग जगताने या खेळाच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,’’ असे बाजवा यांनी स्पष्ट केले.