भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये बिघडलेले क्रीडा संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार प्रयत्न होताना दिसत आहेत. भारताकडून या प्रयत्नांना दाद मिळत नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने द्विपक्षीय कराराचा भंग केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाविरुद्ध (BCCI) आयसीसीकडे दाद मागितली आहे. मात्र पाकिस्तान हॉकी संघटना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांसाठी अद्यापही आशावादी असल्याचं पहायला मिळतंय. २०१८ साली जानेवारी महिन्यात World XI विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हॉकी सामन्यांकरता पाकिस्तान हॉकी संघटनेने, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे प्रमुख नरेंद्र बात्रा यांना कराची आणि लाहोरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

“या सामन्यांसाठी आम्ही प्रत्येक देशांच्या हॉकी संघटनेच्या प्रमुखांना पाकिस्तानात बोलावत आहोत. बात्रांना आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आम्ही आमंत्रित करत आहोत”, असं पाकिस्तान हॉकी संघटनेचे सचिव शाहबाज अहमद यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. १८ जानेवारी रोजी World XI संघ पाकिस्तानात दाखल होणार आहे. यानंतर १९ जानेवारी रोजी कराची आणि २१ जानेवारी रोजी लाहोरला हे सामने खेळवले जाणार आहेत.

या सामन्यांना प्रसिद्धी मिळण्यासाठी पाकिस्तान हॉकी संघटना, माजी खेळाडूंनाही पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण देणार आहे. नरेंद्र बत्रांच्या येण्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातले हॉकीचे सामने पुन्हा सुरु होणार असतील, तर या गोष्टीचं आम्ही नक्की स्वागत करु, असं शाहबाज अहमद यांनी सांगितलं. याआधी नरेंद्र बात्रा यांनीही आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने, भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामन्यांना आपला पाठींबा असल्याचं म्हणलं होतं.

अवश्य वाचा – भारत – पाकिस्तान हॉकी सामन्यांना माझा पाठींबा – नरेंद्र बात्रा

“या सामन्यांसाठी पाकिस्तान हॉकी संघटना, भारताचे माजी खेळाडू धनराज पिल्ले आणि प्रगत सिंह यांनाही आमंत्रण देण्यास उत्सुक आहे. मात्र इतक्या कमी वेळात या दोन खेळाडूंना व्हिसा मिळेल याची खात्री आम्हाला देता येत नाहीये. मात्र या सामन्यांमधून कोणत्याही क्रीडा सामन्यांसाठी पाकिस्तान ही सुरक्षित जागा असल्याचं आम्हाला दाखवून द्यायचं आहे”. पाकिस्तान हॉकी संघटनेचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडीअर खालिद खोकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. सध्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाकिस्तान १३ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे या सामन्यांमधून पाकिस्तान हॉकी संघाच्या कामगिरीत सुधारणा होते का हे पहावं लागणार आहे.