२०१८ साली भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे. दोन देशांमधे बिघडलेल्या वातावरणामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अखेर पाकिस्तान हॉकी फेडरेशनने वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतात येण्याचं मान्य केलं आहे. २०१० साली भारतात झालेल्या हॉकी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ खेळला होता.

२०१४ साली झालेल्या हॉकी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ पात्र ठरु शकला नव्हता. युरो हॉकी चॅम्पियनशीप आणि हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेत सातव्या स्थानावर पोहचल्यामुळे पाकिस्तान यंदाच्या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान भारतात हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. मध्यंतरी पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेसाठी, पाकिस्तान हॉकी बोर्डाने आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांची भेटही घेतली होती.

विश्वचषक स्पर्धेतला पाकिस्तानच्या संघाचा इतिहास हा आश्वासक आहे. आतापर्यंत पाकिस्तानने ४ वेळा हॉकी विश्वचषक जिंकला आहे. तर दोन वेळा पाकिस्तानने उप-विजेतेपद पटकावलं आहे. १९७१, १९७८, १९८२ आणि १९९४ साली पाकिस्तानने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.