बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानला महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या कामगिरीची आशा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत १७६ धावांच्या लक्ष्यास सामोरे जाताना सना मीर हिच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या ८४ धावांमध्ये कोसळला होता.
या लढतीत पाकिस्तानच्या अस्माविया इक्बाल व सादिया युसुफ या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करीत कांगारूंना दोनशे धावांपूर्वी गुंडाळण्यात यश मिळविले होते. पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल निराशा करीत या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीवर पाणी सोडले. न्यूझीलंडविरुद्ध मात्र या चुका टाळण्याचा त्यांचा प्रयत्न राहील अशी आशा आहे.
पाकिस्तानची कर्णधार मीर हिने आतापर्यंत एकदिवसाच्या ५१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. तिच्याबरोबरच मधल्या फळीत नैन फातिमा अबिदी, बिस्माह मारुफ व जावेरिया खान यांच्यावर फलंदाजीची मदार आहे.
ऑस्ट्रेलियाचा मुकाबला आफ्रिकेशी
बलाढय़ ऑस्ट्रेलियाची रविवारी येथे दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे. विजेतेपदासाठी संभाव्य संघ मानला गेलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकण्यासाठी उत्सुक झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेच्या खेळाडूंनी फलंदाजीत सपशेल निराशा केली होती. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. त्याखेरीज त्यांनी ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धाही जिंकली आहे.
अतिशय अनुभवी संघ म्हणून ऑसीकडे पाहिले जात असल्यामुळे आफ्रिकेविरुद्ध त्यांचे पारडे जड राहील अशी अपेक्षा आहे.
वेस्टइंडिजला हरविण्यासाठी श्रीलंका उत्सुक
मुंबई : गतविजेत्या इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळविल्यानंतर श्रीलंका महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडिजवर मात करण्यासाठी उत्सुक झाला आहे. हा सामना रविवारी येथे होणार आहे. लंकेने शुक्रवारी येथे झालेल्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडविरुद्ध सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून खळबळजनक विजय मिळविला होता. विंडीजविरुद्धच्या लढतीत विजय मिळवित सुपरसिक्स गटात स्थान मिळविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
विंडीजला सलामीच्या लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. लंकेस विंडीजविरुद्ध विजय मिळविण्यासाठी ईशानी कौसल्या हिच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत तिने अष्टपैलू कामगिरी करीत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.